

Marleshwar Temple Accident
देवरुख : मार्लेश्वर तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी आलेल्या ईश्वरपूर येथील सहा वर्षीय बालिकेचा डोंगरावरून कोसळलेला दगड डोक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.१३) दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बालिकेचे वडील आणि काकाही जखमी झाले आहेत. ऋत्वी संदीप पाटील असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ईश्वरपूरमधील कापूसखेड येथील पाटील कुटुंबातील आठ जणांचा समूह शुक्रवारी सकाळी मार्लेश्वर आणि गणपतीपुळे येथील दर्शनासाठी घरातून निघाला होता. मार्लेश्वर देवस्थानाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण धारेश्वर धबधब्याकडे गेले. तेथे नदीतील पाण्यात हातपाय धुतल्यानंतर लहान मुलांनी पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले.
नदी पार करून देवस्थान परिसराकडे परतत असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक डोंगरावरून तीन मोठे दगड खाली कोसळले. यातील एक दगड थेट ऋत्वीच्या डोक्यावर आदळला. यात ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. दुसरा दगड तिचे वडील संदीप पाटील यांच्या पायावर पडल्याने ते जखमी झाले, तर तिसरा दगड ऋत्वीच्या काकांच्या हाताला आणि तोंडाला लागल्याने तेही जखमी झाले.
रक्तबंबाळ अवस्थेतील ऋत्वीला कुटुंबीयांनी तातडीने निवे खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे तिच्या डोक्याला बँडेज बांधून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला देवरुख ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने यांनी ऋत्वीला मृत घोषित केले. दरम्यान, तिचे वडील संदीप पाटील यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले.
हसण्या-खेळण्याच्या आणि बागडण्याच्या वयातच ऋत्वीने जगाचा निरोप घेतल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. देवस्थानात दर्शन घेऊन कुटुंबीयांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली होती; मात्र दर्शनानंतर काही वेळातच काळाने घाला घातल्याने पाटील कुटुंबातील महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
ऋत्वीच्या पश्चात आई-वडील, मोठी बहीण अन्विता, काका-काकू आणि चुलत भावंडे असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर ऋत्वीचे पार्थिव सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा देवरुख पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मार्लेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरुंग लावले जात असल्याने डोंगराळ भागात भेगा पडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे डोंगरावरून दगड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या असून, दगड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. मात्र, यावेळी सहा वर्षीय ऋत्वीला आपला जीव गमवावा लागला.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे मार्लेश्वर तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निरपराध बालिकेचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? परिसरातील सुरुंगस्फोटांवर निर्बंध घालून संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी शासन ठोस पावले उचलणार का, असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.