

Sangameshwar Well Leopard Rescue Operation
देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील साडवली (नैदरवाडी) येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने बुधवारी (दि.५) यशस्वी सुटका करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या धाडसी बचाव मोहिमेमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास राजेश परशराम चव्हाण यांच्या खासगी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच संगमेश्वर-देवरुख परिमंडळाचे वन अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता, सुमारे ५ बाय १२ फूट आकाराची व २० फूट खोल आयताकृती विहिरीत बिबट्या पाण्यात पोहत असून भिंतीचा आधार घेत थांबलेला दिसून आला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने तातडीने बचावकार्य सुरू केले. दोरीच्या साहाय्याने लोखंडी पिंजरा विहिरीत उतरविण्यात आला. काही वेळाने बिबट्याने स्वतःहून पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर पिंजरा बाहेर काढून बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले.
साडवली येथील तालुका लघु चिकित्सालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
ही बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सूरज तेली, सुप्रिया काळे तसेच प्राणीमित्र अनुराग आखाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी साडवलीचे पोलीस पाटील आणि स्थानिक ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले.
वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास किंवा अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.