

राजापूर : राजापूर तालुक्यातील सागवे, नाणार आणि कुंभवडे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध दर्शवत पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, असा एकमुखी ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. या उत्खननामुळे परिसरातील आंबा बागायती तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली.
किसान सभागृहात झालेल्या बैठकीला सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, गटविकास अधिकारी एस. जी. म्हेत्रे, सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेत पाणीटंचाई, शेतकरी नुकसानभरपाई पंचनामे, जीर्ण वीज खांब बदलणे, पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांवरील झाडांची छाटणी, एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुविधा आणि तालुका कृषी कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी हलविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
याशिवाय, राजापूर येथील शासकीय विश्रामगृहाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत त्याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती उपसभापती अभिजित गुरव यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातील २० ग्रामपंचायतींची निवड झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.