

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत राजापूर तालुक्यातील पन्हाळी तर्फे सौंदळ येथील हॉटेल समर्थ परिसरातील जंगलमय भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत १ कोटी ९१ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीचे १,६०० बॉक्स (१३,८२४ बल्क लिटर) आणि सहाचाकी कंटेनरचा समावेश आहे. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
पन्हाळी तर्फे सौंदळ येथील हॉटेल समर्थजवळ मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलमय भागात मद्याची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईत रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीचे १,६०० कागदी बॉक्स जप्त करण्यात आले. या मद्याची किंमत १ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपये आहे. तसेच लेलंड १९२० एचएच कंपनीचा सहाचाकी कंटेनर ताब्यात घेण्यात आला. वाहनावर प्रथमदर्शनी आरजे-१४-जीआर-६००४ हा नोंदणी क्रमांक आढळला. मात्र, सखोल तपासणी केली असता नंबर प्लेटखाली वाहनाचा मूळ क्रमांक एचआर-६१-ई-३४१० असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक आरोपी फरार असून, त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान तथा वाहनचालक अतुल विरसिंग बसावे, जवान तथा वाहनचालक विशाल सूर्यकांत विचारे, जवान मानस शंकर पवार आणि जवान अनुराग काशीराम बर्वे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव करीत आहेत.
जिल्ह्यात हातभट्टी दारूची निर्मिती-विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक किंवा साठा तसेच बनावट मद्यविक्री आढळल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.