

रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे-एमआयडीसी परिसरातील ई-69 या प्लॉटवर देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या संशयित नेपाळी महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ताब्यात घेतले. शुक्रवारी सायंकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्लॉटचा मालक सुनिलकुमार गणपत प्रभू (वय 60) यांची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छाप्यात दोन महिलांची सुटका
गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छापा टाकला. या वेळी संशयित नेपाळी महिला पूणे येथील दोन महिलांमार्फत हा अवैध व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या दोन्ही महिलांची सुटका करून देहविक्रीच्या जाळ्यातून त्यांना मुक्त केले. तर संशयित महिलेविरोधात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
औद्योगिक प्लॉटवर भलताच धंदा
ई-69 क्रमांकाचा हा प्लॉट प्रभूंनी 1991 साली औद्योगिक वापरासाठी खरेदी केला होता. परंतु येथे अवैध व्यवसाय सुरु असल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (चखऊउ) यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. ग्रामीण पोलिसांकडून अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित भूखंडाबाबत नोटीस बजावून तो काढून घेण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
‘50-50 फॉर्म्युला’ने चालत होता धंदा
नेपाळी महिला काही वर्षांपूर्वी घरकाम आणि वॉचमन म्हणून काम करत होती. त्यानंतर तिने जिल्ह्याबाहेरील महिलांना देहविक्रीस भाग पाडून मिळणार्या कमाईतून 50 टक्के रक्कम स्वतःकडे ठेवत व उर्वरित 50 टक्के रक्कम त्या महिलांना देत आपले उपजीविकेचे साधन उभारले होते.
पुढील चौकशी सुरू
या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून तिच्या संपर्कात असलेल्यांचा तपास लावण्यात येत आहे. प्लॉट मालकाचीही चौकशी करून त्याची जबाबदारी निश्चित केल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.