रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील सीताराम वीर याच्या खुनातील संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या मित्रांना मदत तसेच त्या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयातून जयगड पोलिसांनी दुर्वासचे वडील दर्शन पाटील यांना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
यापूर्वी या ट्रिपल मर्डर प्रकरणात जयगड पोलिस व शहर पोलिसांनी दुर्वास पाटील, विश्वास पवार, नीलेश भिंगार्डे, सुशांत नरळकर या चार संशयितांना अटक केली आहे. सोमवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे या चारही जणांना पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात आले असता न्यायालयाने दुर्वास पाटील, सुशांत नरळकर, विश्वास पवार या तिघांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली, तर नीलेश भिंगार्डेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
संशयितांना मदत....
दरम्यान, सीताराम वीर खून प्रकरणाचा तपास करताना जयगड पोलिसांना त्याच्या खुनात दुर्वासचे वडील दर्शन पाटील यांचाही सहभाग तसेच या गुन्ह्यात संशयितांना मदत केल्याचा संशय आला. त्यावरून जयगड पोलिसांनी दर्शन पाटीलला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

