

Uday Samant Press Conference
चिपळूण शहर : एकवेळ मनसेला सोबत घेऊ; मात्र उबाठाला सोबत घेणार नाही, असे मत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रविवारी (दि. 29) चिपळुणात पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यासंदर्भात प्रश्न विचारताना राजकारणात उबाठा शिवसेना, मनसे आणि शिंदे सेना अशी युती व्हावी, अशी काही राजकीय नेत्यांची मते व्यक्त होत आहेत. त्यावर त्यांनी हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगून स्पष्टीकरण दिले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार्या शिवसेनेचे खंबीर नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. त्यामुळे आता पुन्हा माघार घेऊन उबाठाला सोबत घेणे शक्य नाही, असे मत व्यक्त केले. शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद झाली.
पत्रकार परिषदेला उमेश सकपाळ यांच्यासह शिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले की, यंदाच्या हंगामात मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमानी प्रवाशांना प्रवास करणे थोडे त्रासदायक ठरेल. मात्र, पुढील वर्षी प्रवासी व चाकरमानी महामार्गावरून सुरक्षित प्रवास करतील. याची हमी आज मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात केलेल्या पाहणीतून देत आहे. दुर्दैवाने गेली दहा वर्षे या महामार्गाचे काम रखडले आहे. मात्र, आता केवळ साडेसात टक्के काम उरले आहे. ते या हंगामात पूर्ण होऊन पुढील वर्षीच्या मे पर्यंत संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण झाले असेल. त्यामुळे पुढील वर्षीच्या प्रत्येक सणाला प्रवासी व चाकरमानी या महामार्गावरून कोकणात सुरक्षितपणे येतील.
पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. आज महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी केली. आता यापुढे प्रत्येक शनिवारी कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्याकरिता चिपळुणातून वाहनाने संपूर्ण महामार्गाच्या कामाच्या प्रगतीबाबत पाहणी करणार आहे. आजच्या पाहणीमध्ये काही ज्या तांत्रिक त्रुटी आढळून आल्या तसेच काही अडथळे आहेत ते दूर करुन पर्याय काढण्याकरिता संबंधित अधिकारी व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन सूचना केल्या आहेत.
ना. सामंत पुढे म्हणाले, चिपळूण शहरात किंबहुना कोकणात जे वणवे लागून निसर्गसंपदा व बागायतदारांचे नुकसान होते, ते टाळण्यासाठी येत्या शनिवारी एक दिवसाची कार्यशाळा घेतली जाणार आहे. यासाठी वन विभागाचे नंदूरबार येथील अधिकारी मार्गदर्शन करतील. या अधिकार्यांनी त्यांच्या विभागात 70 टक्के भाग वणवामुक्त केला आहे. त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून जिल्ह्याला ज्या हाऊस बोट देण्यात आल्या आहेत, त्याची संकल्पना आपली आहे. मात्र, चिपळुणातील हाऊसबोट उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, माझ्या हस्ते उद्घाटनाची प्रतिक्षा करण्यापेक्षा संबंधित हाऊस बोटचे उद्घाटन करून सुविधा देण्याचे स्पष्टीकरण दिले.
विरोधकांच्या चहा-पानावर बहिष्काराबाबत ते म्हणाले, चहा-पानावर बहिष्कार टाकण्याची विरोधकांची परंपरा आहे. त्यांनी बहिष्कार टाकला अथवा नाही तरी विकासकामे थांबणार नाहीत. त्याचा कोणताही परिणाम विकासकामांवर होणार नाही. जनतेने लोकशाही पदधतीने आमची ताकद दाखविली आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीपेक्षा आमची संख्या अधिक आहे.
दरम्यान, उद्यापासून सुरू होणार्या आणि 5 जुलैला होणार्या उबाठा व मनसेच्या हिंदी सक्तीविरोची मोर्चाबाबत ते म्हणाले की, ज्यांनी (उबाठा) आपल्याच कारकिर्दीत तिसरी हिंदी भाषा सक्तीची या अहवालास मान्यता दिली. तेच आता उबाठावाले हिंदी सक्तीला विरोध दर्शवून राजकारण करीत आहेत. त्यांनी मान्यता दिल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या स्वतंत्र मोर्चाला जनतेचा प्रतिसाद मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी मनसेसोबत मोर्चाचे आयोजन केले, अशी उपरोधीक टीका केली.
रायगड जिल्हा पालकमंत्री वादासंदर्भात ना. सामंत म्हणाले, महायुतीमधील तिनही नेते एकत्र बसून हा वाद सोडवतील, असे सांगितले.