

चिपळूण : कापसाळ येथील बैठकीत मार्गदर्शन करताना माजी खासदार विनायक राऊत.
चिपळूण : शिवसेना उबाठा पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत शुक्रवारी चिपळूण दौर्यावर होते. या वेळी त्यांनी प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. संघटनात्मक बांधणी संदर्भात मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी जोमाने तयारीला लागा, अशी सूचना केली. तसेच इच्छुकांनीही कामाला लागावे, असेही आवाहन केले.
माजी खासदार विनायक राऊत यांनी शहरालगतच्या कापसाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसंदर्भात मागदर्शन करताना ते म्हणाले, या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसैनिकांनी झटून काम करायला हवे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे, हे लक्षात ठेवा आणि कामाला लागा, असेही आवाहन केले.
या वेळी उपस्थित पदाधिकार्यांनीही आपल्या परिसरातील प्रश्न, समस्या मांडल्या. या बैठकीला जिल्हा संघटक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संतोष थेराडे, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, जिल्हा उपसंघटक व चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती धनश्री शिंदे, महिला शहर संघटक वैशाली शिंदे, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, युवसेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे नियोजन सचिव प्रशांत मुळ्ये यांनी केले होते.
या बैठकीनंतर माजी खासदार राऊत यांनी चिपळूणमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमची भेट घेत अधिकारी, जवान यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. येथील भौगोलिक परिस्थितीबाबत माहिती देताना काही सूचना देखील केल्या. तसेच राहणे आणि जेवणाच्या सोयीबद्दल आपुलकीने विचारपूस करत काही अडचण असेल तर आपण ती सोडवू, असा शब्दही दिला.