

रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड येथील ट्रिपल मर्डर प्रकरणात जयगड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार सोनावणेला निलंबित करण्यात आले असून पोलिस हवालदार गमरेची चौकशी सुरु असून त्याच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
राकेश जंगम बेपत्ता झाल्याप्रकणी त्याच्या नातेवाईकांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली होती. या प्रकरणात जयगड पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे एक वर्ष उलटूनही त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. अखेर भक्ती मयेकरच्या खुनातील संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या साथिदारांची चौकशी करताना राकेश जंगमचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. राकेशचा मृतदेह आंबा घाटात टाकून देण्यात आला होता. परंतू एक वर्ष उलटून गेल्यामुळे त्याचा मृतदेहाचा शोध घेण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले.
दरम्यान, राकेश जंगम बेपत्ता झाल्यानंतर जयगड पोलिसांनी त्याचा शोध घेण्यात केलेल्या हलगर्जीपणामुळे निर्ढावलेल्या दुर्वास पाटील आणि त्याच्या साथिदारांनी त्याचा खून पचवून पुढे भक्ती मयेकरचाही खून पचवू या आविर्भावात तिचाही मृतदेह आंबा घाटात फेकून दिला. परंतू भक्ती मयेकरच्या खूनाला वाचा फूटल्यामुळे राकेश जंगमचाही एक वर्षापूर्वी खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.याप्रकरणी जयगड दोषी जयगड पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिले होते. त्यानंतर अपर पोलिस अधिक्षक बी.बी.महामूनी यांनी राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील, पोलिस हवालदार सोनावणे आणि गमरे यांनी हलगर्जीपणा केल्याचा अहवाल पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सोपवला. त्याची दखल घेत निती बगाटे यांनी कुलदीप पाटील यांची तातडीने पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली. तर पोलिस हवालदार सोनावणेचे निलंबन करण्यात आले असून गमरेचीही चौकशी सुरु असून त्याच्यावरही निलंबनाची टांगती तलवार आहे.