

रत्नागिरी : जयगड परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने प्रकरणातील हलगर्जीपणाचा आरोप सिद्ध होताच जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली केली गेली. आता जयगड खून प्रकरणात अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा पोलीस दलाकडून चौकशी चालू झालेली आहे.हे कर्मचारी जर दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप सोशल मिडियाव्दारे करण्यात येत होता. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल असा शब्द दिला होता. या वक्तव्याला अनुसरूनच बदलीची कारवाई पार पडली. या संपूर्ण तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे होती.
तपासातून उघडकीस आले की, 6 जून 2024 रोजी राकेश जंगम याचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबाघाट येथे टाकण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीत कबुली दिली. त्याच्यासोबत विश्वास पवार व नीलेश भिंगार्डे यांचीही नावे समोर आली. राकेश जंगम हा दुर्वास पाटीलच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. 21 जून 2024 रोजी राकेशच्या आईने जयगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. संपूर्ण वर्षभर शोधमोहीम राबवूनही जयगड पोलिसांना राकेशचा माग सापडला नव्हता.