

देवरूख : संगमेश्वर येथील सप्तेश्वर रोडवरील मोबाईल टॉवरमधील साहित्याची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दोन संशयितांसह एका अल्पवयीन मुलाला सोमवारी ताब्यात घेतले आहे. त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
संगमेश्वर हिल परिसरातील आयडिया कंपनीच्या मोबाईल टॉवरवर संदीप रामचंद्र पवार हे केअर टेकर म्हणून कार्यरत आहेत.दि. 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी टॉवरच्या परिसरात संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. हे सर्व आरोपी एकमेकांच्या संगनमताने आयडिया-व्होडाफोन कंपनीचे 2 जी बीटीएस या मोबाईल मनोऱ्याचे साहित्य आणि केबल चोरत होते. फिर्यादी संदीप पवार यांनी सतर्कता दाखवत ही बाब निदर्शनास आणली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत फुरकान अब्दुल हक (25, रा. बहरईच, उत्तर प्रदेश) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे
दरम्यान, चौकशी सुरू असतानाच त्यांचे अन्य दोन साथीदार, ज्यामध्ये सय्यद इंजमाम सय्यद हसम आणि एका 30 वर्षीय अनोळखी तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी संदीप पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 62, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावित या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत.