Ratnagiri Petroglyphs |कातळशिल्पांना आता शालेय शिक्षणातही स्थान

इयत्ता सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकात कातळशिल्पांची माहिती समाविष्ट
Ratnagiri Petroglyphs
Katal Shilpa educationpudhari photo
Published on
Updated on

राजापूर : हजारो वर्षांपूर्वीच्या कोकणातील आदिम मानवाच्या अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक कातळशिल्पांना (Petroglyphs) आता शालेय शिक्षणातही मानाचे स्थान मिळाले आहे. इयत्ता सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकात कातळशिल्पांची माहिती समाविष्ट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना या अनमोल सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्याची तसेच त्याचे महत्त्व जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे नव्या पिढीत इतिहास, पुरातत्त्व आणि वारसा संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कातळांवर कोरलेली हजारो वर्षे जुनी कातळशिल्पे गेल्या काही वर्षांत संशोधकांच्या प्रयत्नांमुळे प्रकाशझोतात आली. निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, ऋत्विज आपटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून विविध प्राणी, मानवी आकृती, भौमितिक रचना, दिशादर्शक खुणा आणि अन्य चित्रात्मक शिल्पांचा अमूल्य ठेवा समोर आला. ही कातळशिल्पे प्राचीन मानवाचे जीवन, संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक परंपरांची मौल्यवान साक्ष मानली जातात.

या अद्वितीय वारशाच्या संवर्धनासाठी संशोधकांसह शासनही सातत्याने प्रयत्नशील आहे. कातळशिल्पांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, रूढेतळी, देवाचेगोठणे, बारसू, देवीहसोळ, जांभरूण, कुडोपी आणि उक्षी या आठ महत्त्वाच्या स्थळांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर ओळख मिळविण्याच्या उंबरठ्यावर असलेला हा वारसा आता शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचणार आहे.

Ratnagiri Petroglyphs
Ratnagiri Heavy Rain | किनारपट्टीवर लाटांचे रौद्ररूप; काही वस्त्यांमध्ये घुसले पाणी

पाठ्यपुस्तकात कातळशिल्पांचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना संशोधक सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे यांनी सांगितले की, गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ आम्ही कोकणातील कातळशिल्पांचा शोध, संशोधन, संवर्धन आणि जनजागृतीसाठी सातत्याने कार्य करत आहोत. कातळशिल्पांची शास्त्रीय नोंद, स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि या वारशाचे महत्त्व समाज, संशोधक तसेच शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

या विषयाला शालेय अभ्यासक्रमात स्थान मिळणे म्हणजे आमच्या दीर्घ आणि खडतर प्रवासाला मिळालेली पावती आहे. कातळावर कोरलेल्या त्या आदिम रेषा केवळ पाठ्यपुस्तकाच्या पानांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कुतूहलात, विचारांत आणि संवेदनशील मनात कोरल्या जाव्यात. त्यातून भविष्यात संशोधक, संवर्धक आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणारा सजग नागरिक घडावा, हीच आमच्या प्रयत्नांची खरी कमाई आहे, असेही ते म्हणाले.

Ratnagiri Petroglyphs
landslide Veral Ghat | वेरळ घाटात दरड कोसळली

इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात कातळशिल्पांना मिळालेल्या या स्थानामुळे कोकणातील हा प्राचीन वारसा आता केवळ संशोधनाचा विषय न राहता विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्रवासाचा व सांस्कृतिक अभिमानाचा अविभाज्य भाग ठरणार आहे. वारसा संवर्धनाची जाणीव रुजविण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news