Ratnagiri Heavy Rain | किनारपट्टीवर लाटांचे रौद्ररूप; काही वस्त्यांमध्ये घुसले पाणी

प्रशासनाकडून खबरदारी
Ratnagiri Heavy Rain |
रत्‍नागिरी : मिर्‍या किनार्‍यावर धडकणार्‍या समुद्राच्‍या अजस्र लाटा.
Published on
Updated on

रत्नागिरी : धुवाँधार पडणारा पाऊस आणि कोकण किनारपट्टीवर समुद्राला आलेल्‍या उधाणामुळे किनार्‍यावर धडकी भरवणारे रूप पाहायला मिळत आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या अथांग किनारपट्टीवर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास समुद्रात तब्बल ३.४ ते ४.४ मीटर उंचीच्या अक्राळविक्राळ लाटा उसळल्या. यावेळी समुद्राचे रौद्ररूप पाहायला मिळाले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुपारी १ वाजताच्या सुमारास भरतीची वेळ आणि या अजस्र लाटांचा मेळ एकाचवेळी जुळून आला. त्यामुळे समुद्राचे पाणी थेट किनाऱ्यावरील काही वस्त्यांमध्ये आणि रस्त्यांवर घुसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ४.४ मीटर म्हणजेच जवळपास १४ ते १५ फूट उंच असलेल्या या अक्राळविक्राळ लाटा किनाऱ्यावर प्रचंड वेगाने आदळत होत्या.​ या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांना समुद्रात जाण्यास पूर्णपणे बंदी घातली होती. ­­

बंधाऱ्यामुळे मिऱ्या सुरक्षित

पंधरामाड, भाटीमिऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी किनारपट्टीवर संरक्षक बंधारा उभारण्याचे काम गेली तीन वर्षे सुरू असून, काम अंतिम टप्प्यात आले असून यावर्षी या बंधार्‍याचा फायदा स्थानिकांना झाला आहे. किनारपट्टीवर उसळणाऱ्या महाकाय लाटा या बंधाऱ्यावर आदळून मागे जात असल्यामुळे गाव सुरक्षित झाली आहेत. जिल्‍ह्यातील अनेक किनार्‍यांवर या बंधार्‍यांमुळे सुरू बनेही सुरक्षित झाली आहेत.

संततधार पावसामुळे धरणे व नद्यांची पाणी पातळी वाढ

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. संततधार पावसामुळे धरणे व नद्यांची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकूण पर्जन्यमान ८७६.३३ मि.मी., तर सरासरी ९७.३७ मि.मी. पाऊस पडला आहे. सततच्‍या पावसामुळे तालुक्‍यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांकडून भात लावणीस प्रारंभ झाला आहे.

जिल्‍ह्यात सलग पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिल्‍यामुळे दिवस-रात्र पावसाची बरसात सुरू आहे. चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस मंडणगड, गुहागर, दापोली, राजापुरात झाला आहे, तर सर्वात कमी संगमेश्वर तालुक्‍यात पडला आहे. पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. तसेच राजापूरसह इतर ठिकाणी घरांची, रस्‍त्‍यांची पडझड झाली असल्‍याची घटना घडली आहे. रत्‍नागिरी तालुक्‍यातील हातखंबा येथे मुख्‍य रस्‍ताच खचला आहे. चिपळूण तालुका परिसरात ६०७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीच्‍या उंबरठ्यावर आली आहे. तसेच काजळी नदीत १२.७९ मीटर पाणीपातळी आहे. शास्‍त्री, बावनदी, वशिष्ठी, सोनवी, कोदवली नदीच्‍या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news