रत्‍नागिरी : दीड महिन्यापूर्वी बेपत्‍ता झालेली विवाहित महिला सापडली

file photo
file photo

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा दीड महिन्यापूर्वी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्र किनार्‍यावरुन बेपत्ता झालेल्या विवाहितेचा शोध लागला असून, ती नागपूर येथे असल्याची माहिती जयगड पोलिसांना मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने स्वतः नागपूर येथील इमामवाडा पोलिस ठाण्यात जाउन आपला जबाब दिला. इमामवाडा पोलिसांनी जयगड पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे. ती सुखरुप असल्याची माहिती मिळाल्याने जयगड पोलिसांनी तिचा शोध तपास थांबवला आहे.

सुनिता रामचंद्र पाटील उर्फ निकिता (वय 57,रा.मांगले शिराळा,सांगली) असे त्या महिलेचे नाव आहे. रविवार 21 जानेवारी 2024 रोजी रोजी सुनिता पाटील आपल्या मैत्रिणींसह पर्यटन आणि देवदर्शनासाठी सांगलीहून श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आल्या होत्या. देवदर्शन झाल्यानंतर त्या सर्वजणी गणपतीपुळे समुद्रामध्ये समुद्रस्नान करत असताना सुनिता पाटील अचानकपणे गायब झाल्या होत्या. ही बाब त्यांच्या मैत्रिणींच्या लक्षात येताच त्यांनी आजुबाजुला सुनिताचा शोध घेतला, परंतू त्या कोठेही दिसून आल्या नव्हत्या. तसेच त्यांच्याकडे मोबाईलही नसल्याने संपर्क करणेही शक्य झाले नव्हते. त्यामुळे सुनिताच्या मैत्रिणींनी त्यांचे पती रामचंद्र पाटील यांना फोन करुन त्या बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.

रामचंद्र पाटील यांनी गणपतीपुळे येथे आल्यानंतर गणपतीपुळे पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली होती. पोलिसांनी तेथील सीसीटिव्ही फूटेज तपासून पाहिल्यानंतर सुनिता एका दुचाकीवर पाठीमागे बसून जाताना दिसून येत होत्या. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक क्रांती पाटील तपास करत होत्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनिता पाटील यांनी नागपूर येथील इमामवाडा पोलिस ठाण्यात स्वतः जाउन आपण घरात कोणालाही न सांगता नागपूरला आल्याचे सांगितले. आपण सुखरुप असून घरी परत गेल्यास पती आपल्याला जिवे ठार मारेल अथवा मी स्वतःच्या जिवाचे काहीतरी बरे वाईट करुन घेईन त्यामुळे आपला शोध थांबण्यात यावा अशी विनंती त्यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news