

चिपळूण : गेल्या चार दिवसांपासून साफयिस्ट कंपनीतील कामगारांचे साखळी उपोषण सुरूच आहे. या कामगारांशी चर्चेस आलेल्या सहायक आयुक्त संदेश आयरे यांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला देताच संतापलेल्या कामगारांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. कंपनीचा निरोप घेऊन येऊ नका असे सुनावले. दरम्यान, उपोषणकर्त्यांपैकी चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीच्या विरोधात 221 कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण उग्र होत आहे. या उपोषणाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनीधी व संबंधीत अधिकाऱ्यांना देखील या उपोषणाची दखल घेणे भाग पडले आहे. या पार्श्वभूमीवर सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी सोमवारी (दि. 17) उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली.
या भेटीदरम्यान आयरे यांनी संबंधीत कामगारांना कायदेशीर मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या या सल्ल्यावर कामगारांनी आक्रमक भूमिका घेत कंपनीतून निरोप घेऊन येऊ नका, असे सुनावले. त्यानंतर या कंपनीत पर्यायी व्यवस्था म्हणून महिला कागारांची भरती केल्याने त्याविषयी देखील कंपनीच्या कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधीत महिलांना कंपनीच्या प्रवेश द्वारावरच अटकाव करण्यात आला. त्यामुळे महिला कामगारांनी कंपनीच्या प्रवेश द्वारावरच ठिय्या मांडला. या गोंधळामुळे काहींसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे येथे पोलिस बंदोबस्त वाढण्यात आला होता.
या कामगारांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, ॲड. अमित कदम, सूर्यकांत खेतले, स्वप्निल शिंदे यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत कामगारांची बाजू मांडली. सुरुवातीला या कंपनीतील 28 कामगारांवरून गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आता 20 कामगारांना कदापी कामावर न घेण्याचा पवित्रा कंपनी व्यवस्थापनाने घेतल्याचे कामगारांनी सांगितले. सर्वच कामगारांना कंपनीने सामावून घ्यावे, या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम असल्याने साखळी उपोषण सुरूच आहे.