

आशिष कारेकर
गुहागर : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दुर्मीळ समुद्री पक्ष्याचे दर्शन घडल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. समुद्रात दीर्घकाळ वास्तव्य करणारा आणि क्वचितच किनाऱ्यावर दिसणारा हा पक्षी ‘ब्राऊन बूबी’ (Brown Booby) प्रजातीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
सामान्यतः उघड्या समुद्रात मासेमारी करत जीवन व्यतीत करणारा हा पक्षी किनाऱ्याजवळ फारसा आढळत नाही. त्यामुळे गुहागर किनाऱ्यावर त्याची उपस्थिती ही दुर्मीळ घटना मानली जात आहे. पक्ष्याच्या आगमनामागे सध्या बदलत असलेली हवामान परिस्थिती, समुद्रातील वाऱ्यांचा वेग आणि वातावरणातील बदल कारणीभूत असावेत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
गुहागर समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीपर्यंत सुट्ट्यांमुळे येथे मोठी गर्दी होती. मात्र, पर्यटन हंगाम ओसरत असतानाच या दुर्मीळ पक्ष्याच्या दर्शनाने परिसरातील निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
ब्राऊन बूबी हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय समुद्री भागात आढळणारा पक्षी असून, त्याची तीक्ष्ण दृष्टी आणि समुद्रात झेपावत मासे पकडण्याची शैली वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. समुद्रातील परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या या पक्ष्याचे कोकण किनाऱ्यावर दर्शन होणे हे जैवविविधतेच्या दृष्टीने सकारात्मक संकेत मानले जात आहेत. दरम्यान, या पक्ष्याची नेमकी ओळख आणि तो येथे कशामुळे आला याबाबत वनविभाग व पक्षी अभ्यासकांकडून अधिक माहिती घेतली जात असून, या दुर्मीळ पाहुण्याने गुहागरच्या किनाऱ्याला काही काळासाठी वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.