

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या प्राजक्ता (सारा) भांबुरे-बोंगाळे यांनी अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन सैन्यात दाखल होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला ठरल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या या यशामुळे दापोली, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकन लष्कराचे अत्यंत कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत जिद्द, मेहनत कर्तृत्वाची जागतिक स्तरावर छाप उमटवली आहे.
लहानपणापासूनच शिस्तबद्ध जीवन आणि सैन्यदलाविषयी आकर्षण असलेल्या प्राजक्ता यांनी सैनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यांनी सातत्याने शारीरिक तंदुरुस्ती, शैक्षणिक प्रगती आणि कठोर प्रशिक्षणावर भर दिला. अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी अमेरिकन सैन्याच्या निवड प्रक्रियेत यश मिळवले आणि त्यानंतरचे कठीण प्रशिक्षणही यशस्वीरीत्या पूर्ण केले.
सध्या प्राजक्ता अमेरिकन सैन्याच्या मेडिकल विभागात कार्यरत आहेत. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी उत्कृष्ट नेमबाजीचे कौशल्य सिद्ध करत प्रतिष्ठेचे 'मार्क्समन शिप' पदक पटकावले. इतकेच नव्हे, तर संपूर्ण प्रशिक्षणात सर्वाधिक शैक्षणिक गुण मिळवून बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेचीही वेगळी ओळख निर्माण केली. प्राजक्ता यांचा प्रवास केवळ सैन्य क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रातही छाप सोडली असून, विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत त्यांनी बहुआयामी व्यक्तिमत्त्व सिद्ध केले आहे. मात्र देशसेवा आणि शिस्तबद्ध जीवनाची ओढ त्यांना अखेर अमेरिकन सैन्यापर्यंत घेऊन गेली. कोकणातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने जागतिक दर्जाच्या सैन्यदलात स्थान मिळवल्याने दापोलीसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे काैतूक होत आहे.
जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि स्वतःवरील विश्वास यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे प्राजक्ता बोंगाळे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे युवक-युवतींना मोठी प्रेरणा मिळाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी युवाशक्तीचा ठसा उमटविणाऱ्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.