

रत्नागिरी : राज्यातील बालमृत्यूंपैकी तब्बल 16.3 टक्के मृत्यू न्यूमोनियामुळे होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, या जीवघेण्या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभरात ‘सांस’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ही मोहीम 12 नोव्हेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबवली जाणार असून, 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मलीनाथ कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी दालनात ‘सांस’ मोहिमेच्या नियोजानांसाठी बैठक पार पडली. एकूण होणाऱ्या बालमृत्यूंपैकी तब्बल 16.3 टक्के मृत्यू न्यूमोनियामुळे होत असल्याने सदर सांस मोहीमच्या यशस्वितेसाठी आरोग्य विभागाने सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका घराघरांत भेट देऊन 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करतील. न्यूमोनियाची लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक उपचार आणि आवश्यक असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या मोहिमेबाबत सोशल मीडिया, पोस्टर, बॅनर, हस्तपत्रिका आदी माध्यमांतून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. जलद श्वास, छातीत आत ओढले जाणे, ताप, सतत किंवा जास्त काळ खोकला, श्वास घेण्यास त्रास / धाप लागणे, बाळ दूध न पिणे, बाळ सुस्त पडणे किंवा खूप रडणे, खेळणे बंद करणे, बेशुद्ध पडणे, ओठ व बोटे निळसर दिसणे, ऑक्सिजन पातळी 90% पेक्षा कमी होणे, न्यूमोनियाची ही प्रमुख चेतावणीची लक्षणे आहेत जन्मानंतर 6 महिने निव्वळ स्तनपान, योग्य व पूरक आहार, पूर्ण लसीकरण, वैयक्तिक स्वच्छता ,धूररहित स्वयंपाकगृह, हिवाळ्यात मुलांचे संरक्षण करणे.
‘सांस’ मोहिमेचा हेतू केवळ उपचारापुरता मर्यादित नसून न्यूमोनियाबाबत समाजात शाश्वत जागरूकता निर्माण करणे, धोका ओळखणे आणि वेळेवर कृती करणे हा आहे. योग्य वेळी निदान व उपचार मिळाल्यास न्यूमोनियामुळे होणारा एकसुद्धा बालमृत्यू टाळता येऊ शकतो, हीच या मोहिमेची प्रेरणा आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. घरी भेट देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून मुलांची तपासणी करून घ्यावी, तसेच परिसरात या मोहिमेबाबत जागरूकता वाढवावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.