

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने नुकतीच आर्थिक कामगिरीबाबत बैठक पार पडली. या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण राज्याचे उत्पन्न ११,४७५ कोटी इतके झाले असून खर्च १२, ०६६ कोटी इतका झाला आहे.
दररोज एक कोटी ६० लाख रूपयांचा तोटा होत आहे. दरम्यान, रत्नागिरी एसटी विभाग ही तोट्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील ३१ आगारापैकी कोल्हापूर, नाशिक, नागपूर, सातारा, ठाणे या मोठ्या विभागांचा तोटा वाढला आहे. त्यामुळे एसटी तोटा कमी करण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस नियोजन करा असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.
रत्नागिरी विभागात ७५० हून अधिक एसटी बसेस आहेत. दररोज लाखो-कोटीचा उत्पन्न मिळतो. मात्र दोन वर्षात मोठ्या प्रमाणात एसटी बसेस स्क्रॅपमध्ये गेल्या आहेत. तसेच तब्बल ९४० चालक, वाहकासह इतर पदे रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर लोड पडत आहे. परिणामी एसटी वेळेवर सुटत नाही.
वाढलेले तिकीट दर, वेळापत्रक, बसेस नादुरूस्त, कमी बसेस संख्या यासह विविध कारणांमुळे रत्नागिरी एसटी विभाग तोट्यात जात आहे. मात्र आषाढी, दिवाळी, शिमगा, शैक्षणिक सहल, उन्हाळी वाहतूकीत रत्नागिरी विभागाला मोठे उत्पन्न मिळते. मात्र इतरहंगामामध्ये रत्नागिरी विभागाचे उत्पन्न कमी होत असल्याचे चित्र आहे.
नवीन बसेस, कर्मचारी भरती, वेळेत एसटी सोडणे, अचानक एसटी बसेस रद्द न करणे यासह विविध समस्या दूर झाल्यास रत्नागिरी विभाग तोट्यात ऐवजी फायद्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील वर्षात जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे ८ विभाग फायद्यात आहेत.