

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
शहरानजीकच्या मिऱ्या येथील साळवी कुटुंबाने दुर्मीळ प्रजातीच्या घुबड पक्षाला जीवदान दिले. मिऱ्या येथील जाकीमिऱ्या येथे पांढऱ्या रंगाचे घुबड भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते. कुत्र्यांच्या हल्ल्यातून सोडवत वन विभागाच्या स्वाधीन केले.
दोन दिवसांपूर्वी ही घटना जाकिमिऱ्या येथे घडली. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या घुबडावर कुत्र्यांनी हल्ला चढवला. ही बाब नजीकच राहणाऱ्या साळवी कुटुंबाच्या निदर्शनास आली. यावेळी सुधीर साळवी, प्रणिता साळवी आणि रूपेश सावंत यांनी तत्काळ धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून घुबड पक्षाची सुटका केली.
यानंतर घुबड पक्षाला घरी घेऊन जात त्याच्या जखमा साफ केल्या. दुसऱ्या दिवशी साळवी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घडला प्रकार सांगितला. शुक्रवारी दुपारी वन विभागाचे अधिकारी मिऱ्या येथे साळवी यांच्या घरी पोहचले. साळवी यांच्याकडून घुबडाचा ताबा घेत त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे. साळवी यांच्या पक्षी प्रेमामुळे मिऱ्या येथील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.