

देवरूख : श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील धारेश्वर धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासह श्रावण मासानिमित्त मार्लेश्वर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी पर्यटक व भक्तगण यांची सध्या प्रचंड गर्दी होत आहे. या धबधब्यापर्यंत जाण्याचा मार्ग बंद ठेवल्यामुळे पर्यटकांना दुरूनच त्याचे विहंगम सौंदर्य पहावे लागत आहे.
धारेश्वर धबधब्याचा उगम सह्याद्री पर्वतरांगांवरील पूर्वीच्या गोठणे गावातून झाला आहे. मार्लेश्वर या तीर्थक्षेत्राजवळ वाहत येणारा हा सातवा धबधबा आहे. तो पावसाळ्यात रौद्ररूप धारण करतो. शिवाय मार्ग अवघड असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद ठेवला आहे. पावसाळ्यानंतर रस्ता खुला होतो.
श्रावणमासात मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी दर सोमवारी भक्तांची गर्दी होत असून, पहाटेपासूनच मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते. या तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी श्रावण सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातून बससेवा सुरू आहे. देवस्थानने महिलांसाठी तोकडे कपडे वापरावर बंदी आणली आहे.
धबधब्याकडे जाण्यासाठी ब्रिज उभारणी सुरू
शिखरापर्यंत जाण्यासाठी पायथा ते शिखर अशा पायऱ्यांची सुविधा आहे. याचबरोबर धबधब्याकडे जाण्यासाठीदेखील नवीन ब्रिज उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. हा ब्रिज झाल्यावर पर्यटकांना धबधब्याकडे जाताना खाचखळग्याचा त्रास कमी होणार आहे.
रत्नागिरी ते मार्लेश्वर मार्ग (७५ कि.मी.)
रत्नागिरी - हातखंबा पांगरी मार्गे देवरूख - मारळ - मार्लेश्वर