.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मंडणगड : विनोद पवार
कृषीप्रधान ओळख असलेल्या मंडणगड तालुक्यात शेतीखालील क्षेत्र सातत्याने घटत असल्याचे वास्तव समोर आले असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हे चिंतेचे कारण ठरत आहे. साधारण 15 वर्षांपूर्वी पाच हजार हेक्टरवर असलेले लागवडीखालील क्षेत्र आता अडीच हजार हेक्टरच्या घरात घसरल्याने तालुक्यात कृषी व्यवस्थेचा घसरता आलेख स्पष्ट होत आहे. घटते कृषी क्षेत्र पुन्हा वाढवण्याचे मोठे आव्हान प्रशासन आणि कृषी विभागासमोर उभे ठाकले आहे.
तालुक्यातील शेती प्रामुख्याने भात पिकावर आधारित आहे. मात्र उत्पादनाला योग्य बाजारपेठ नसल्याने शेतीतील अर्थकारण कोलमडले. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवत उदरनिर्वाहासाठी स्थलांतराचा मार्ग स्वीकारला. कृषी उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभागीय कार्यालय मंडणगडमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न आमदार योगेश कदम यांनी केले असून, त्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, जंगली श्वापदांचा वाढता उपद्रव हीदेखील शेतीपुढील गंभीर समस्या बनली आहे. हातातोंडाशी आलेले पीक वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतीसाठी संरक्षक कुंपण उभारण्याकरिता शासनाकडून अनुदान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर किनारी भागात खारे पाणी आणि वाढते कांदळवन यामुळे अनेक शेती क्षेत्रे नापिक बनत असल्याने शेतीचे प्रमाण घटत चालले आहे.
विशेष म्हणजे तालुक्यात दरवर्षी सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत असतानाही शेतीकडे होत असलेली उदासीनता ही कृत्रिम कारणांमुळे असल्याचे जाणकारांचे मत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संकरीत बियाणे आणि कृषी क्रांतीच्या गप्पा होत असताना मंडणगडमधील कृषी क्षेत्र मात्र विरोधाभासी चित्र निर्माण करत आहे.
शेतीकडे पुन्हा शेतकऱ्यांचा ओढा निर्माण करण्यासाठी बाजारपेठ, संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या प्रभावी योजनांची जोड आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. कृषी विकासाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकत नाही, हे वास्तव लक्षात घेऊन आता मंडणगडमधील घटते कृषी क्षेत्र वाढवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.