रत्नागिरी ः तालुक्यातील गावडे - आंबेरे येथे दुचाकीवर मागे बसलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 9 जानेवारी) सकाळी 6.30 च्या सुमारास घडली.तेजोमय जगदीप डोर्लेकर (15, रा. गावडे - आंबेरे, रत्नागिरी) असे जखमी युवकाचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी तेजोमय हा त्याचा चुलत भाऊ प्रथमेशच्या दुचाकीवर पाठीमागे बसून पूर्णगड ते गावडे-आंबेरे असा मासे विकून सकाळी 6.30 वा. सुमारास घरी जात होता. त्यांची दुचाकी गावडे आंबेरे - बिर्जेवाडी येथील चढावात आली असता अचानकपणे जंगलातून एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तेजोमयच्या डाव्या पायावर पंजाने हल्ला करून त्याला जखमी केले. बिबट्याने अचानकपणे हल्ला केल्याने दोघेही दुचाकीवरून खाली पडल्याने बिबट्याने जंगलात धाव घेतली. दरम्यान, जखमी तेजोमयला उपचारासाठी प्रथम जाकादेवी येथील खासगी डॉक्टरांकडे व अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
तेथे उपचार केल्यानंतर तेजोमयच्या नातेवाईकांनी रत्नागिरी येथील वन विभागात जाऊन बिबट्याच्या हल्ल्याची माहिती दिली. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले असून गावडे आंबेरे येथील नागरिकांना बिबट्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच तेजोमयवर अधिक उपचारांची गरज असल्यास त्याला सर्व ती मदत वनविभागाकडून करण्यात येईल अशी ग्वाही वनविभागाकडून नातेवाईकांना देण्यात आले.