

शिराळा शहर : औंढी (ता. शिराळा) येथील विकास जालिंदर पाटील यांच्या शेतामध्ये ऊस चालू असताना, अचानक बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. एक नर व दोन मादी, अशे दोन ते तीन महिन्यांचे हे बछडे आहेत. ही घटना शुक्रवार, दि. 9 रोजी दुपारी घडली.
बुधवारी उपवळे येथील स्वरांजली पाटील या चिमुरडीवर बिबट्याने केलेला हल्ला आणि तिला वाचवण्यासाठी भाऊ शिवम याने केलेला प्रयत्न, ही घटना ताजी असताना पुन्हा तीन बछडे सापडले आहेत. याशिवाय 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरदरम्यान कापरी येथेही तीन वेळा दोन बछडे आढळले होते. या घटनेची माहिती प्राणी मित्र सुशीलकुमार गायकवाड व धीरज गायकवाड यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर बिबट्याचे तीन बछडे मिळाल्याची माहिती दूरध्वनीवरून वनपाल अनिल वाजे व वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांना दिली. बचाव पथकासमवेत ते घटनास्थळी दाखल झाले. बछड्यांना ताब्यात घेऊन एका कॅरेटमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. बछड्यांची आईशी पुनर्भेट घडवून आणण्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. तसेच थर्मल ड्रोनमार्फत वनविभागाचे पथक, प्राणी मित्र लक्ष ठेवून आहेत. वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, प्राणी मित्र संतोष कदम, अक्षय डांगे, रणजित सातपुते यासाठी प्रयत्न करीत आहेत.