

LCB drug operation Ratnagiri
रत्नागिरी : खेड पोलिस ठाणे यांनी आपल्या हद्दीत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी कुवारबाव येथे 31 मे ते 3 जून या कालावधीत अमली पदार्थ विरोधात चार कारवाया केल्या. यामध्ये 2 लाख 36 हजार 711 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी भरणे नाका, तुतारी एक्सप्रेस या ठिकाणी गस्ती दरम्यान तीन जणांना एकूण 3 किलो 228 ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवार 3 जून रोजी रत्नागिरी एमआयडीसी येथे गस्त करताना शफाकत हसन राजपूरकर (40,रा.देवरुख,रत्नागिरी) याला 10 ग्रॅम ब्राउन हेरॉईनसह अटक केली. या चारही कारवायांमध्ये अमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण 2 लाख 36 हजार 711 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिस विभागाने अमली पदार्थ संदर्भातील गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी एनडीपीएस अॅक्ट खाली सन 2024 मध्ये 3 आरोपींना तडीपार केले आहे. तसेच सन 2025 मध्ये आतापर्यंत 5 आरोपींना तडीपार केले असून अजूनही 12 आरोपींविरोधात तडीपारीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिली.