

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता वेबिनार आयोजित केले जाणार आहेत. वेबिनारची लिंक व्हॉटस्ॲप ग्रुपद्वारे पाठविण्यात येणार आहे. कृषि सेवक, सहायक कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले.
दरम्यान, बदलत्या हवामानामुळे कीड व रोगांचा आंबा फळपिकांवर प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्याअनुषंगाने कृषि विभाग रत्नागिरी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी व आंबा उत्पादक शेतकरी यांचे समवेत जिल्ह्यातील पहिला ऑनलाइन वेबिनार पार पडला. वेबिनारचे अध्यक्षस्थान विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांनी भूषवले.
या ऑनलाइन वेबिनारमध्ये डॉ. जालगावकर, संशोधन उपसंचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, डॉ. वानखेडे, कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, डॉ. मुळे कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ कृषि कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, व डॉ. पोटफोडे, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली इत्यादी शास्त्रज्ञ उपस्थित होते. या ऑनलाईन वेबिनारमध्ये शेतकऱ्यांना आंबा मोहर संरक्षण तसेच आंबा फुलकिड व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी करण्याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले.