रत्नागिरी : रेल्वे वाहतूक 24 तासांनी सुरू

रुळावरील दरड हटवली; अनेक गाड्या रद्द
Konkan railway
कोकण रेल्वे २४ तासानंतर सुरू झाली.File Photo
Published on
Updated on

खेड /रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे खेडनजीक दरड कोसळून ठप्प पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक सोमवारी सायंकाळी 4.30 वाजता ‘ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट’ मिळाल्यावर सुरू करण्यात आली आहे. जवळपास 24 तासांनी रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यात रेल्वे प्रशासनाला अखेर यश आले आहे. या कालावधीत विविध स्थानकांवर अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांना जवळपास 100 एस.टी. गाड्यांमधून मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आले.

Konkan railway
दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. दिवाणखवटी बोगद्यानजीक रविवारी सायंकाळी 4 वा. 48 मिनिटांनी रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या तर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. दरडीची माती रुळांवर आल्याने रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरड कोसळल्याची माहिती मिळताच कोकण रेल्वेची बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. शेकडो मजूर, अभियंते रेल्वेची वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत जवळपास 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मार्गावरील दरड पूर्णपणे हटवून मार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र ( ट्रॅक फिटनेस प्रमाणपत्र) जारी केल्याने रेल्वेने वाहतूक सुरु झाल्याचे सांगितले. त्या आधी या घटनेनंतर अनेक गाड्या विविध स्थानकांवर अडकून पडल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील फलाटावरच रात्र काढावी लागली.

या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दि. 14, 15 जुलैच्या देखील बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये वंदे भारत एकस्प्रेससह मंगळूरु एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, सावंतवाडी-मडगाव पॅसेजर या गाड्यांचा समावेश आहे. याचरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या दुसर्‍या मार्गाने वळवल्या आहेत.

Konkan railway
Konkan Railway : रेल्वे मार्गावर अडकलेल्या प्रवाशांना एसटीने सुरक्षित ठिकाणी पोहचवले

दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली तर श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात, मडगाव सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि रत्नागिरी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (12052) रत्नागिरीत तर सावंतवाडी-दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आली. रविवारी मुंबईतून सुटलेली एलटीटी-त्रिवेंद्रम खेड येथे थांबवण्यात तर गांधीधाम-नागरकोईल विन्हेरे स्थानकाववर थांबवण्यात आली होती. याचबरोबर हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्स्प्रेस मडगावमध्ये थांबवण्यात आली एलटीटी-मंगळुरू एक्स्प्रेस ही या घटनेनंतर रोहा येथे थांबवण्यात आली रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील विविध स्थानकांत खोळंबा झालेल्या हजारो प्रवाशांचे कोकण रेल्वेने टान्सशिपमेंट केले. यामध्ये या सर्व रेल्वे प्रवाशांना जवळपास 100 एसटी गाड्यांमध्ये बसून त्यांना मुंबई तसेच पनवेलच्या दिशेने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.

रत्नागिरी, चिपळूण, खेड येथून एस.टी. गाड्यांची सुविधा

मुंबईच्या दिशेने जाणार्‍या गाड्यांमधील प्रवाशांचा खोळंबा झाल्याने कोकण रेल्वेने रत्नागिरी, चिपळूण तसेच खेड येथे रेल्वे गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी एस.टी. बसेसची मदत घेतली. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी येथून 32, चिपळूण येथून 14, तर खेड रेल्वे स्थानकात अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांना 13 एस.टी. बसेसमधून मुंबईच्या दिशेने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याइतक्याच बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही सोडण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news