

विशाळगड : सुभाष पाटील
श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुणी ऊन पडे !
डोंगर कपाऱ्यातून कोसळणारा मुसळधार पाऊस..धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे..शुभ्र खळखळत फेसाळणारे झरे, निसर्गाने पांघरलेला हिरवा गालिचा, आल्हाददायक गुलाबी थंडी हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर वर्षा पर्यटनाला 'आंबा घाटात' जायला हरकत नाही.
आंबा घाट जैवविविधतेने नटला असून वन आणि वन्यजीव अभ्यासक, पर्यटकांना भुरळ घालत आहे. गावाच्या एका बाजूला शेकडो वर्षे जपून ठेवलेली देवराई. मानोली धरणाचा रम्य परिसर, पावनखिंड आणि बारमाही हिरवागार असलेला हा परिसर सर्वानाच मोहित करतो. सध्या पर्यटकांनी हा परिसर बहरून गेला आहे. हिरवीकंच गर्द झाडी, नागमोडी वळणाचा तीव्र घाट, थंडगार वारा, कोसळणारे धबधबे, दाट धुक्यात मार्गक्रमण करणारी वाहने असा निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण करणारा आंबा घाट सर्वांनाच आकर्षित करत आहे.
कोकण व घाट यांचा दुवा साधणाऱ्या आंबा घाटात आंबाखिंड, गायमुख, विसावा पॉइंट वजरेखिंड, चक्रीवळण येथील रमणीय दृश्य कॅमेराबद्ध करण्यासाठी पर्यटकांची चढाओढ लागते. आंबा घाटात दाट धुके, थंडी आणि पाऊस यांचा अनोखा मिलाफ अनुभवता येतो. घाटात पर्यटकांना थांबण्यासाठी गोमुख तसेच अन्य दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. डोंगरकपारी आणि जंगलाचा विस्तीर्ण परिसर मनसोक्त अनुभवायाचा असेल तर या परिसराची माहिती असणारा जाणकार हवाच. सध्या हे काम प्रमोद माळी, अजिंक्य बेर्डे करत आहेत.
अंतर : कोल्हापूरपासून ६५ किलोमीटर
मार्ग : कोल्हापूर, मलकापूर, आंबा
घाटातील निसर्ग सौंदर्य, जंगल, समृद्ध वनराई, रानगव्यांचे दर्शन, निसर्ग माहिती केंद्र, गायमुखातून बारमाही वाहणारे पाणी, आंबेश्वर देवराई, सासनकडा, सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य, कोकण पॉईंट, जवळच असणारा वाघझरा, पावनखिंड, विशाळगड.
गावरान कोंबड्याचा तांबडा-पांढरा रस्सा, ज्वारी, नाचणीची भाकरी, झुणका-भाकर, मक्याचे कणीस