

Vaibhav Khedekar joins BJP
खेड : मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर आज (दि. १४) त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
वैभव खेडेकर हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले होते. याआधी दोनदा त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता, त्यामुळे स्थानिक राजकारणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अखेर आज त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या पक्षप्रवेशामुळे भाजपला खेड तालुक्यात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये बळकटी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खेडेकर यांच्या राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, भाजपकडून त्यांना कोणत्या पदाची संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, खेड शहरात व तालुक्यात या पक्षप्रवेशाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून, खेडेकर यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.