

Health Award
रत्नागिरी : केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार्या 2024-25 या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 137 आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्यातील 1 ग्रामीण रुग्णालय, 19 प्राथमिक आरोग्य केंद्र, 116 आरोग्य उपकेंद्रं आणि 1 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण 137 आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूरने जिल्हास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर प्रथम क्रमांक पटकावला. पुरस्कार रक्कम 2 रु. लाख जाहीर झाली आहे.
उर्वरित 18 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी पुरस्कार रक्कम रु. 50 हजार जाहीर झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर पुरस्कारात चिपळूण तालुक्यातील रामपूर, कापरे, अडरे, खरवते, राजापूर तालुक्यातील धारतळे, सोलगाव, गुहागरातील कोळवली, दापोली तालुक्यातील पिसई, आसूद, उंबर्ले, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, बुरंबी, वांद्री, लांजा तालुक्यातील रिंगणे, साटवली, शिपोशी, रत्नागिरीतील वाटद, कोतवडे यांचा समावेश आहे.
दापोली तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र शिरखळला उपकेंद्रस्तर प्रथम क्रमांक पुरस्कार रक्कम रु. 1 लाख, तसेच उपकेंद्र माटवन व उपकेंद्र खेरडी यांना समान गुणांमुळे प्रथम रनरअप असलेली पुरस्कार रक्कम विभागून प्रत्येकी रु. 25 हजार जाहीर झाली आहे. उपकेंद्र पालगड द्वितीय रनरअप पुरस्कार रक्कमरु. 35 हजार व उर्वरित 112 आरोग्य उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम रु.25 हजार जाहीर झाली आहे. संगमेश्वरातील ग्रामीण रुग्णालय देवरुखला ग्रामीण रुग्णालयस्तर प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम 1 लाख जाहीर झाली आहे.
या यशासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्तजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतूक केले. लवकरच पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.