

खेड : तालुक्यातील तळे ग्रामपंचायतचे कर्मचारी मंगेश शिर्के यांचा मोठा मुलगा सोहम मंगेश शिर्के (वय १५) याचा विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. नुकताच इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेला हा होतकरू विद्यार्थी अकाली मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीची शुक्रवारी (१३ जून) तळे कासारवाडी येथे दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात पार पडली.
सोहमच्या निधनामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या अवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पंचक्रोशीतील सुमारे १५ गावांची आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी आहे. रुग्णालयासाठी दोन कोटी रुपये खर्चून उभारलेली इमारत व पन्नास लाख रुपये खर्चून डॉक्टरांसाठी बांधलेले निवासस्थान असूनही येथे अद्यापही पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. ग्रामस्थांच्या मते, कोणीही डॉक्टर त्या निवासस्थानात राहत नाही, हे अत्यंत गंभीर बाब आहे.
सध्या या आरोग्य केंद्रात ओपीडी सेवा केवळ दुपारी १ वाजेपर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर डॉक्टर हे अन्य ठिकाणी निघून जातात. शेतीच्या हंगामात सर्पदंश व विंचूदंशाच्या घटना वारंवार घडत असतात, मात्र एमबीबीएस डॉक्टर नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे सोहमसारखा निष्पाप जीव गमवावा लागला, हे अत्यंत दुःखद आहे.
हा प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात उपस्थित केला जात असून, संबंधित आरोग्य विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेने याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.