

Guhagar ST Depot new buses
गुहागर : गुहागरचे आमदार, शिवसेना नेते व विधीमंडळ गट नेते भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर आगार (एस.टी.डेपो) मध्ये मंजूर केलेल्या एकूण दहा गाड्यांपैकी नविन पाच एस्.टी.बस नागरीकांच्या सेवेसाठी गुहागर आगार येथे दाखल झाल्या आहेत. आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते आज गुहागर येथे नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर एसटी डेपोत या बसेसचा लोकार्पण सोहळा केल्यानंतर गुहागर एसटी डेपोच्या आवारातच नवीन बस चालवली.
यावेळी त्यांनी २५ ते३० वर्षांपूर्वी घडलेला एक मोठा प्रसंग सांगितला. आपल्यावर एकेकाळी पॅसेंजरने भरलेली एसटी बस चालवण्याची वेळ का आली? त्याचा किस्साही सांगितला. 'पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मी एकदा ओमळी ते चिपळूण असा प्रवास करत होतो, त्यावेळी चालक अचानक आजारी पडला, त्याच्या अंगात गाडी चालवण्याचा त्राण राहिला नाही. त्याला उलट्या सुरू झाल्या. तो अत्यवस्थ झाला. एसटी ड्रायव्हर आजारी पडला त्यामुळे मला पॅसेंजरने भरलेली बस ओमळी ते चिपळूण अशी आणावी लागली. आजही मी ही बस डेपोतच का चालवली, बाहेर चालवली तर या गोष्टीचं कुणीतरी राजकारण करेल आणि कारणाशिवाय गुहागरच्या एसटी डेपो मॅनेजरला याचा जाब विचारेल की आमदार एसटीची गाडी बाहेर कशी काय चालू शकतात? म्हणून मी डेपोच्या आवारातच ही ट्रायल घेतली. कारण हल्ली महाराष्ट्रात छोट्या छोट्या गोष्टीचं राजकारण करण्याची अतिशय घाणेरडी प्रथा पडली आहे', असाही टोला भास्कर जाधव यांनी लगावला
सोमवारी आमदार भास्कर जाधव यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी उबाठा शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, गुहागर पंचायत समिती माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, स्नेहा वरंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, गुहागर पंचायत समिती माजी सभापती सुनील पवार, विलास वाघे, राजेंद्र आरेकर पिंट्याशेठ संसारे, सचिन जाधव, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, कृपा हेअर टॉनिक चे मालक राजेंद्र दळी, सिद्धिविनायक रिसॉर्ट चे मालक व युवा कार्यकर्ते प्रशांतशेठ विचारे, गुहागर शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव,राज विखारे, प्रवीण प्रकाश रहाटे ,पारिजात कांबळे अगदी मान्यवरांसह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते नवीन एसटीच्या गाड्यांचे पूजन करण्यात आले. लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव तसेच आमदार भास्कर जाधव व सर्व कार्यकर्त्यांनी गुहागर एसटी स्टँड ते मोडका आगर पर्यंतचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान अनेक गमती जमती त्यांनी कार्यकर्त्याना सांगितल्या.