

गुहागर : गुहागर नगरपंचायत निवडणुकीत महायुती होणार असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यामुळे महायुती होणार असल्याचे नक्की झाले असून जागा वाटपाबाबत मात्र चर्चाच सुरू आहे.
गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे महायुतीची बैठक झाली. त्या बैठकीत गुहागर नगरपंचायतीसाठी महायुती म्हणून निवडणूक लढविण्याचे निश्चित करण्यात आले.? असे असले तरी अद्यापही नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांबाबत बोलणी अंतिम टप्प्यात आली नसल्याने चर्चा सुरूच आहे. महायुतीतील शिंदे शिवसेना, भाजप व अजित पवार गट राष्ट्रवादी यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया सुरू करून उमेदवार निश्चित केले आहेत. इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता करून आपले ऑनलाईन अर्ज भरून ठेवलेले आहेत व पुढील पक्ष आदेश येण्याची वाट बघत असल्याचे राजकीय वर्तुळातून समजते.
काहींनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. मात्र असे असले तरी अद्यापही 17 प्रभागातील कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकाच जागेवर तिनही पक्षांकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. गुहागर नगरपंचायतीची नगराध्यक्ष व सर्वच 17 जागेवर महायुतीचाच विजय व्हावा असे आदेश पक्षातील वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडून संबंधित प्रभागामध्ये आपल्याला किती मतदान मिळू शकेल याचा लेखाजोखा वरिष्ठांना सादर केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुती होणार हे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. मात्र, अद्यापही उमेदवारांची यादी समोर आलेली नाही. यातच महाविकास आघाडीच्यावतीने आमदार भास्कर जाधव यांनी आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून एक पाऊल पुढे टाकले आहे. या यादीत आठ महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्याबाबत महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.