

रत्नागिरी : कर्तव्य बजावताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांरील हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनने मंगळवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
जळगाव जिल्ह्यातील शिवरे येथे कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यांना धमक्या, दबाव तसेच हल्ल्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील शिवरे येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. स्व. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी हे शासनाच्या विविध योजना आणि निर्णयांची अंमलबजावणी गावपातळीवर करीत असतात. त्यामुळे त्यांना काम करताना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे युनियनने स्पष्ट केले. ग्रामसभांबाबतही मागण्या ग्रामसभांची संख्या मर्यादित करावी, ग्रामसभेदरम्यान होणाऱ्या अनधिकृत व्हिडीओ चित्रीकरणाला आळा घालावा, अशी मागणीही करण्यात आली.
ग्रामसभांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणारा दबाव आणि अनधिकृत चित्रीकरणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून शासनाने स्पष्ट नियमावली करावी, अशी भूमिका युनियनने मांडली. याशिवाय संवेदनशील ग्रामपंचायतींच्या बैठकांना सक्तीचे आणि विनामूल्य पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याचे पालन करताना कोणत्याही प्रकारची भीती राहू नये, यासाठी ग्रामपंचायतनिहाय सुरक्षेचे मूल्यांकन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाडिक, जिल्हा सरचिटणीस संजय दळवी यांच्यासह युनियनचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुकास्तरीय पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.