

Ratnagiri Zilla Parishad CEO Orders
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दडी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला आहे. लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सोमवारपासून (दि. 22) सकाळी 7 ते 11.30 या वेळेत भरणार आहेत, असे परिपत्रक जिल्हा परिषदच्या सीईओ वैदेही रानडे यांनी शनिवारी (दि.२०) काढले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन झालेल्या मौसमी पावसाने नंतर विश्रांती घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील तापमान वाढले. सकाळपासूनच सायंकाळपर्यंत तीव्र उष्मा होत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत होता. विद्यार्थी, पालक, विविध संघटनाने शाळा सकाळी सुरू करा अशी मागणी केली होती.
त्यावर स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा परिषदच्या सर्व शाळा सकाळी सुरू करा, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी दिली होती.
दरम्यान, शाळा शुक्रवारी सुरू होणार होत्या. मात्र, सीईओ रानडे यांची सही न झाल्यामुळे शाळांना आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर शनिवारी जिल्हा परिषद शाळांना सकाळच्या वेळेत शाळा भरव्यात, असे आदेश आले आहेत.
30 जूनपर्यंत शाळा सकाळी भरणार असून जर पाऊस नियमित सुरू झाल्यास पूर्वीच्या वेळेनुसार शाळा सुरू होतील, असेही सांगण्यात आले आहे. दिलेल्या आदेशाचे शाळा व्यवस्थापनांनी काटेकोरपणे पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
शाळांना मार्गदर्शक सूचना
- जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय करावी
- विद्यार्थ्यांना शाळेत येताना पाण्याची बाटली व टोपी आणण्याची कल्पना द्यावी
- उन्हाचा त्रास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना मैदानावर पाठवू नये