

देवरूख : देवरुख नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी खरी लढत युती विरुद्ध आघाडी व अपक्ष यांच्यातच पाहायला मिळणार आहे. 17 प्रभागातील नगराध्यक्षपदांसाठी 4 प्रभागांमध्ये हाय व्होल्टेज निवडणूक सामना रंगणार आहे. 5 प्रभागांमध्ये चुरस होणार असून 2 प्रभागांमध्ये एकतफीर्र् निर्णय 6 प्रभागांमध्ये केवळ लढत पाहायला मिळणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी पाच वर्षे नगराध्यक्ष म्हणून चांगले काम करणार्या मृणाल शेट्ये यांना माजी सभापती अपक्ष उमेदवार स्मिता लाड व उबाठाच्या सबुरी थरवळ या लढत देत आहेत. आप या पक्षाने प्रथमच या निवडणुकीत उडी घेतल्याने दीक्षा खंडागळे यांचा प्रभाव किती पडतो हे मतमोजणीनंतरच कळणार आहे. अपक्ष उमेदवार वेदिका मोरे या किती तरुण मतदारांना मते देण्यास भाग पाडतात यावरच त्यांच्या मतांची आकडेवारी राहणार आहे.तसेच नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी नगरसेवक बाबू मोरे यांच्या पत्नी जान्हवी मोरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे. मात्र भाजपाच्या समृद्धी वेलवणकर व उबाठाच्या पूजा मांडवकर, अपक्ष ऋणीता पेंढारी या उमेदवार ही निवडणूक खेळीमेळीने लढताना दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये माजी स्वीकृत नगरसेवक यशवंत गोपाळ यांच्यासमोर उबाठाचे नितीन गोपाळ आपचे सुनील करंडे व अमित कदम, योगेश खाके व अनंत पाताडे हे तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनवली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये माजी नगरसेविका रेश्मा किर्वे यांचे पती तुकाराम किर्वे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिंदे गटाचे दिलीप गेल्ये व उबाठाचे अमित जाधव यांच्यासमोर आव्हान ठाकले आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकेकाळचे मित्रच आज समोरासमोर निवडणूक लढवत असल्याने शिंदे गटाचे वैभव पवार विरुद्ध उबाठाचे महेश पवार यांच्यात हाय व्होल्टेज निवडणूक रंगणार असल्याचे मानले जात आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये देखील माजी नगराध्यक्षा स्वाती राजवाडे यांच्यासमोर उबाठाच्या सिद्धी लिंगायत व अपक्ष उमेदवार अर्चना गुरव उभे राहिल्यामुळे ही निवडणूकदेखील चुरशीची मानली जात आहे.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये माजी नगरसेवक प्रफुल भुवड यांच्या पत्नी प्राची भुवड त्यांच्यासमोर त्यांच्याच कुटुंबातील शर्मिला भुवड या उबाठा गटातून उभ्या राहिल्या असून मनसेच्या श्रावणी घडशी यांनी देखील निवडणुकीत रंगत आणली असली तरीही ही निवडणूक एकतर्फी मानली जात आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाच्या श्रद्धा इंदुलकर यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे. त्यांच्यासमोर शरदचंद्र पवार गटाच्या वैशाली शिंदे तर माजी नगरसेवक दत्ताराम कांगणे यांच्या पत्नी सुजाता कांगणे यांनी या निवडणुकीत रंगत आणली आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपाचे सुबोध लोध, उबाठाचे आनंद कुमटेकर, देवरुख च्या निवडणुकीतील एकमेव काँग्रेसच्या निशाणीवर लक्ष्मीकांत जाधव उमेदवार उभे असून शेखर जोगळे, विनायक मांगले यांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक देखील अटीतटीची पाहायला मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये देखील भाजपाच्या बंडखोर उमेदवार कविता नार्वेकर विरुद्ध विद्यमान युतीच्या नगरसेविका प्रतिक्षा वणकुद्रे, नगरसेविका उबाठाच्या अनुष्का टिळेकर, आपच्या मेघा बेर्डे व सिद्धी जंगम अपक्ष अशी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपाचे चेतन पाडळकर विरुद्ध शरदचंद्र पवार गटाचे निलेश भुवड उमेदवार उभे असून त्यांना अपक्ष उमेदवार अक्षय झेपले चांगली लढत देताना दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये मनसेचे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर त्यांच्यासमोर अजित पवार गटाचे हनीफ हरचिकर, आपचे सचिन आपिष्टे व उबाठाचे निलेश जोशी हे उमेदवार उभे ठाकले आहेत. यामुळे ही निवडणूक देखील हाय व्होल्टेज मानली जाते. प्रभाग क्रमांक 12 मध्ये देखील हाय व्होल्टेज सामना रंगणार असून भाजपाचे महेश धामणस्कर उबाठाचे चंद्रकांत कामेरकर व मनसेचे सागर संसारे अशी रंगत पाहायला मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाच्या प्रियांका कदम व उबाठाच्या रितिका कदम यांच्यात रंगत असली तरी निवडणूक एकतर्फाच दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये माजी नगरसेविका मनस्वी आंबेकर यांनी भाजपाकडून बंडखोरी केली आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी लढताना कुटुंबातील शिंदे गटाच्या नेहा आंबेकर यांच्याशी लढत होत असताना अपक्ष उमेदवार म्हणून स्मिता लाड यांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. तर उबाठाच्या रूपाली मोरे निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. प्रभाग क्रमांक 15 मध्ये माजी नगरसेविका निधा कापडी यांच्या समोर शिंदे गटाच्या नंदिनी सावंत, मनसेच्या वैष्णवी संसारे तसेच अपक्ष निलोफर कावणकर व प्रणाली विंचू यांनी ही निवडणूक चुरशीची बनवली आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये माजी सभापती अजित गवाणकर यांच्यासमोर अजित पवार गटाचे उमेदवार दीपक खेडेकर व माजी नगरसेवक राजेंद्र गवंडी, उमेश शिवगण, दीपक तावडे, विकास साबळे, विशाल तावडे हे अपक्ष उमेदवार उभे ठाकले असल्याने ही निवडणूक देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये महायुतीच्या रूपाली बेंद्रे या उमेदवाराचे पारडे जड दिसत असून उबाठाच्या उमेदवार साक्षी पर्शराम निवडणूक रिंगणात असल्या तरी ही लढत एकतर्फी मानली जात आहे.