राजापूर : राजापूर रोड रेल्वे स्टेशनला परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे. त्यामध्ये रेल्वे गाड्याही उशिरा धावत आहेत. विशेष रेल्वे गाड्यांसोबतच ज्या प्रवाशांनी आरक्षण केले आहे, असे प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये घुसण्यासाठी कसरत करत होते. अनेकांचे आरक्षण असूनही त्यांना त्यांच्या आरक्षित डब्यामध्ये प्रवेश करता आला नाही, एवढी गर्दी राजापूर स्थानकात पाहायला मिळाली.
राजापुरात मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण होत असल्याने नियमित गाड्यांमध्ये देखील आणि गणपती स्पेशल रेल्वेमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळाली. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजापूर पोलिस स्थाकांनातून पोलिस त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचे सिंधुदुर्गपासून आधीच्या स्थानकापासूनच प्रवास करणार्या काही प्रवाशांनी बंद केलेले दरवाजे उघडण्यासाठी आतील प्रवाशांना विनंती करावी लागत होती. सध्या राजापुरात एसटी आगर व रेल्वे स्टेशन दोन्ही ठिकाणी गर्दीच गर्दी पहावयास मिळत आहे.
सध्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी गर्दी केली जात आहे तर दुसरीकडे राजापूर रोड रेल्व स्टेशनचे काम जोरदार चालू आहे. यामुळे प्रवाशांंना अडथळे पार करीत स्टेशनमध्ये ये जा करावी लागत आहे. गणेशोत्सवासाठी असलेल्या चाकरमन्यांना तर याचा खूपच त्रास सहन करावा लागला. राजापूर रेल्व स्टेशनच्या 53 पायर्या चढून येत असताना दमछाक होत असताना स्टेशनच्या बाहेर जाताना दगड, वाळू, सिमेंट, सळया आदी बांधकामासाठी लागणार्या साहित्यांचा अडथळा पार करीत मुख्य रस्त्यावर यावे लागत आहे. यामुळे चाकरमान्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
परतीच्या प्रवासामध्येही तीच अवस्था असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कामकाज चालू असल्याने सद्यस्थितीत स्टेशनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे तर कामकाजामध्ये अनागोंदी चाललेली दिसून येत आहे. यावेळी गर्दीचा उच्चांक झाला असताना मात्र येथील स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु असल्याने बसण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना धूळ खात उभे राहावे लागत आहे तर फलाटावरही छत नसल्याने पाऊस व उन्हामध्ये ताटकळत उभे रहावे लागत आहे.
यावेळी काही नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही. धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने येथील उपहारगृहही दोन दिवस बंद ठेवावे लागले. यामुळे प्रवाशांच्या खाण्या पिण्याची मोठी गैरसाय झाली. स्टेशनवरील विकासाचे हे काम पावसाळयामध्ये सुरू करण्यात आले असल्याने गैरसोयीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. काम करीत असताना बाहेरील बाजूला विद्युतची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने प्रवासांना काळोखातूनच प्रवास करावा लागत आहे.
स्टेशनच्या कामकाजाच्या बाबतीत तक्रारीचा सूर ऐकायला मिळत आहेत. याबाबत संबधित ठेकेदारांकडे चौकशी करण्यासाठी गेले असताना संबधित ठेकेदार उपस्थितच नसल्याचे दिसून येत आहे. व्यवस्थापक फक्त ऐकून घेण्याचे काम करीत आहे. यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नसल्याने संताप केला जात आहे. घाईगडबडीत करण्यात येणारे कामकाज भविष्यात कोलमडून पडून दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.