रत्नागिरी : गणेशोत्सव सहा दिवसांवर येऊन ठेपला असून चाकरमान्यांची पावले तयारीसाठी हळुहळू कोकणाकडे वळू लागली आहेत. पुढील दोन दिवसांपासून हे प्रमाण वाढणार असून, त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शासन व प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासह अपूर्ण असलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गतवर्षी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत: लक्ष घालत महामार्ग गणेशोत्सवासाठी योग्य व्हावा म्हणून प्रयत्न केले होते. एक लेन डिसेंबरपयर्र्त व्हावी, यासाठी त्याचे सातत्याने लक्ष दिले होते. या वर्षी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पळस्पे फाट्यापासून पोलादपूर कशेडी घाटापर्यंत महामार्गाची पाहणी केली. यावेळी ठेकेदारांच्या गलथान कारभाराचा नमुना त्यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी बोगदा ते आरवलीपर्यंतच्या दोन्ही लेन सुरु आहेत. आरवलीपासून संगमेश्वरपर्यंत जवळपास एक लेन पूर्ण झाली आहे. सावर्डे वहाळ फाटा, आरवली येथील जोडरस्ते, संगमेश्वरपर्यंत काही ठिकाणी असलेली डायव्हर्जनच्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येत आहे. महामार्गावर संगमेश्वरपासून उक्षीपयर्र्त एक लेन काही भाग सोडल्यास पूर्ण होत आली आहे. याठिकाणचे डायव्हर्जन डांबरीकरणाने भरले जात आहे. वांद्रीपासून निवळीपर्यंत आणि हातखंब्यात काही ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट आहे. रात्रीच्यावेळी धुळीमुळे डायव्हर्जन दिसूनही येत नाहीत त्यामुळे या भागात अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. हातखंबा टॅब ते पालीपर्यंत बर्यापैकी रस्ता झाला आहे. पालीपासून पुढे दोनशेमीटरपर्यंत रस्त्याचे काम सुरु असून पुढे काँक्रिटीकरण झाले आहे. आंजणारी घाट व त्यामुळे रस्ता बर्यापैकी झाला असल्याने प्रवास सुखकर होणार आहे.
महामार्गावर पाली तसेच लांजा येथे उड्डाणपुलांची कामे संथ गतीने सुरु आहेत. त्याचाही फटका वाहनचालकांना बसत आहे. मात्र, डायव्हर्जन व खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरु असून गणेशोत्सवाचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे.