

चिपळूण : चिपळूण - कराड राष्ट्रीय मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. या भागातील सोनपात्रा परिसरातील अवघड वळण तर मृत्यूचा सापळाच बनले आहे. चढ-उताराच्या या वळणावर मोठ मोठे खड्डे पडले असून दरदिवशी या ठिकाणी मालवाहू ट्रक, कंटेनर व टँकर उलटण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने डोळेझाक केली आहे.
अनेकवेळा अपघात घडून हा मार्ग ठप्प होत असताना अद्याप या ठिकाणचे खड्डे भरले जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी टँकर कलंडल्याने काही काळ येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला कुंभार्ली घाट मार्ग आता ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. या मार्गावर सोनपात्रा येथील चढ-उताराच्या तीव्र वळणावरच मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात वाहने अडकून उलटण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रवासी वाहतूक देखील या मार्गावरूनच सुरू असल्याने एसटी चालकांना कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत.
शुक्रवारी सकाळीही या ठिकाणी टँकर उलटून अपघात झाला. त्यामुळे कुंभार्ली घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीला जागा नसल्याने अवजड वाहतूक ठप्प झाली होती तर छोटी वाहने एकेरी मार्गाने काढण्यात येत होती. दरम्यान, कुंभार्ली घाटातील वाढत्या अपघातांमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनीही या मार्गावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही दिला आहे.