

देवरुख : शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. कृष्णा शंकर गोसावी (वय 45 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, कृष्णा गोसावी यांनी मद्यप्राशन केले होते. ते देवरुख येथील सप्तलिंगी नदीवरील पुलावरून ये-जा करत असताना अचानक तोल गेल्याने थेट नदीपात्रात कोसळले.
ही घटना रात्री 7 च्या सुमारास घडली. हा प्रकार मार्गावरून जाणार्या वाहनचालकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ मदतीस धाव घेत गोसावी यांना नदीपात्रातून बाहेर काढले व उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती कृष्णा गोसावी यांना मृत घोषित केले. यानंतर रात्री उशिरा कृष्णा यांच्या मृतदेहाचे शवविछेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. गोसावी हा भंगार गोळा करण्याचे काम करत असे. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदशनाखाली होत आहे. गोसावी यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे.