Loss of Natural Indicators-बदलत्या जीवनशैलीत निसर्गातील संवादच हरवला!

शेतकऱ्यांचे 'हवामान अंदाज' कोलमडले; चमचमणारे काजवे; रातकिड्यांची किरकिर, बेडकांचे डरावडराव थांबले !
Loss of Natural Indicators-बदलत्या जीवनशैलीत निसर्गातील संवादच हरवला!
Published on
Updated on

गुहागर : आशिष कारेकर

पर्यावरणातील बदल आणि आधुनिक जीवन पद्धती यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. निसर्गातील संवादच हरवला आहे. पूर्वी पावसाळा सुरू होण्याच्या आधी म्हणजेच मे महिन्याच्या शेवटी प्रत्येक झाडावर चमचमणारे काजवे दिसत असत. जणू विद्युत रोषणाई केल्याचा भास होत असे. पावसाळा आला की रातकिड्यांची किरकिर ऐकू येत असे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात बेडकाचे डराव डराव ओरडणे आता ऐकूच येत नाही. या सर्वावरून शेतकरी पावसाचा अंदाज बांधत होते. मात्र आता शेतकऱ्यांचा पारंपरिक हवामान अंदाज कोलमडला आहे.

पारंपरिक जीवनशैलीचा विचार करता पूर्वी शेतकरी काही गोष्टींवरून अचूक अंदाज बांधत असत आणि त्यांचा तो अंदाज खराही ठरायचा. मे महिन्यात रोहिणी नक्षत्रावर पेरणी केल्यानंतर पावसाची शेतकरी वाट पाहत असे. त्यांना ठाऊक असे की मिरगात पाऊस निश्चित पडेल आणि पाऊस तेव्हा पडायचा. मात्र त्या आधी मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात काजवे चमकायला लागले की शेतकरी म्हणायचे की पाऊस निश्चितच लवकर येईल.

Loss of Natural Indicators-बदलत्या जीवनशैलीत निसर्गातील संवादच हरवला!
Ratnagiri Mental Hospital Diet Issue Resolved |मनोरुग्णालयातील रुग्णांच्या आहाराचा प्रश्न सुटला

काजव्यांचे थवेच्या थवे झाडांवरती रात्रीच्या वेळी चमकताना दिसत असतं. जणू विद्युत रोषणाई केल्याचा भास होत असे. मात्र आता काजव्यांची संख्याच दिसत नाही. त्याचबरोबर रातकिड्यांची किरकिर एवढी असायची की, कानावर हात घ्यायला लागत असे. पण आता पावसात रातकिड्यांची उपस्थिती कमी दिसते. जेव्हा प्रत्यक्ष पाऊस सुरू झाला की डराव डराव ओरडणारे बेडूक सुद्धा कमी झाले आणि त्यांचा आवाज ही कमी झाला. पावसात बेडूक जास्त ओरडत असेल तर त्यावरून शेतकरी पावसाचा अंदाज बांधत होते. मात्र आता किती पाऊस पडला तरी बेडकाचे डराव डराव ओरडणे अजिबात कानी पडत नाही. कारण बेडूक हा पहिल्यापेक्षा दुर्मीळ झालेला दिसून येतो.

बेडूक ग्रामीण भागात जास्त करून गोठ्याच्या बाजूला असलेल्या शेणकाईमध्ये आणि पाण्याच्या डबक्यात दिसून यायचे. मात्र आता बेडकांची संख्या कमालीची कमी झालेली आढळून येत आहे. त्यामुळे नैसर्गिक बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जास्त पाऊस पडला आणि पाण्यावरती जर बुडबुडे येत असतील तर शेतकरी म्हणायचे की पावसाचा जोर वाढणार आहे. अमावस्येला पाऊस जोर धरणार आहे, असा शेतकऱ्याचा अंदाज असे. पावसाची जी नक्षत्र आहेत त्या

नक्षत्रांचे जे वाहन आहे ते वाहन जर बेडूक, मोर, हत्ती, म्हैस अशी वाहने असतील तर भरपूर पाऊस पडणार असं शेतकरी समजून जायचे आणि कोल्हा, उंदीर आणि गाढव अशी जर नक्षत्राची वाहने असतील तर पाऊस कमी पडणार असा त्यांचा अंदाज असे. मात्र त्यावेळेला अंदाज खरा ठरत होता, परंतु आता बदलत्या जीवनशैलीत पर्यावरणाचे संतुलन सुद्धा बदलल्याने हा अंदाज चुकीचा ठरत आहे.

Loss of Natural Indicators-बदलत्या जीवनशैलीत निसर्गातील संवादच हरवला!
Ratnagiri Lote MIDC Water Crisis | लोटे एमआयडीसीवर पाणीबाणी; ४८ तासांत उद्योग ठप्प होण्याची भीती

यावर्षी मृग नक्षत्र बेडकावरती असूनही या नक्षत्रातले बहुतेक दिवस कोरडेच गेले आहेत. हा पर्यावरणात झालेला बदल आपल्याला दिसून येतो. आता आपल्याला काजवे पण दिसत नाहीत. रात्री रातकिड्यांचा आवाजसुद्धा कमी ऐकू येतो आणि बेडकाचे ओरडणे तर फारच दुर्मीळ झालेले आहे. त्यामुळे या नवीन पिढीला या सर्व गोष्टी अनुभवता येत नाहीत. जुनी लोकं यावरून अनेक गोष्टीचा अंदाज अचूकपणे बांधत होती. आधुनिक जीवन पद्धती आणि बदललेले पर्यावरणातील वातावरण व त्याचा परिणाम सध्या दिसून येत आहे. खरंतर नैसर्गिक संपदा जपणे आपल्याच हातात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news