

रत्नागिरी : पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीतील फिनोलेक्स केमिकल जेटीजवळ मंगळवारी दुपारी अंदाजे ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रात फिरण्यासाठी गेलेल्या १६ तरुणांचा जीव धोक्यात आला होता. पावस येथून निघालेल्या ‘सरस्वती’ बोटीचा तोल जाऊन ती पलटी झाली आणि सर्व तरुण समुद्रात पडले. मात्र फिनोलेक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, समुद्र खवळलेला होता तसेच बोटीत क्षमतेपेक्षा जास्त तरुण असल्याने बोट पलटी होऊन ही घटना घडली. घटनेनंतर फिनोलेक्स कंपनीची ‘अल फरदिन’ नावाची बोट आणि ‘सिल्वर सन’ पायलट बोटीवरील कर्मचारी तत्काळ मदतीसाठी धावले. अल फरदिनवरील तांडेल फरीद याने, तसेच पायलट बोटीवरील HC मुजावर, MSFचे जवान विजय वाघब्रे आणि अपूर्व जाधव यांनी धाडसी प्रयत्न करून समुद्रात अडकलेल्या सर्व १६ तरुणांना सुखरूप बाहेर काढले.
या बोटीत केतन आडविलकर, मयुरेश वरवटकर, महंत खडपे, ध्यानेश्वर डोळेकर, आर्यन वरवटकर, श्रेयस वरवटकर, कुणाल डोरलेकर, स्वानंद वरवटकर, अथर्व नाचणकर, साई वाडेकर, सुमित बोरकर, गौरंग सुर्वे, ओम सुर्वे, अथर्व सुर्वे, रुद्र सुर्वे यांच्यासह एकूण १६ तरुण प्रवास करत होते.
अपघातानंतर सर्वांना सुखरूप वाचवण्यात आल्यानंतर पूर्णगड पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेत फिनोलेक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे १६ तरुणांचे प्राण वाचले. स्थानिक प्रशासन व नागरिकांकडून या कर्मचाऱ्यांचे आणि सुरक्षा दलातील जवानांचे कौतुक केले जात आहे.