

रत्नागिरी : खरीप हंगामातील दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीचा आधार मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, मदतीच्या प्रक्रियेत तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे निर्माण झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहेत. जिल्ह्यात ३१ हजार २४८ बाधित शेतकरी असताना, आतापर्यंत २० हजार २३५ शेतकऱ्यांच्याच खात्यावर अग्रीम मदत जमा झाली आहे. त्यामुळे सुमारे ११ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
खरीप हंगामात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. दिवाळीपूर्वी ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन होते. मात्र, ॲग्रीस्टॅक अथवा फार्मर आयडी, ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार संलग्न बँक खात्याची पडताळणी आणि महसुली नोंदीतील त्रुटींमुळे मदत वितरणाची प्रक्रिया अडखळली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार २३५ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख ७५ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी दूर कराव्या लागत आहेत. परिणामी, मदतीची घोषणा होऊनही प्रत्यक्ष लाभ मिळण्यात विलंब होत आहे.
ॲग्रीस्टॅक, ई-केवायसीचा अडसर
अग्रीम मदतीच्या वितरणात ॲग्रीस्टॅक अथवा फार्मर आयडी नसणे, ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असणे, आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसणे, बँक खात्याची माहिती न जुळणे अशा अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची मदत मंजूर होऊनही खात्यात रक्कम जमा होण्यास अडथळे येत आहेत.
दिवाळीपूर्वीच्या मदतीची प्रतीक्षा
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत मिळेल, अशी आशा होती. मात्र, वितरणातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक विवंचनेत गेली. आता त्रुटी दूर करून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम मदत कधी जमा होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महसुली नोंदीतील त्रुटींचाही फटका
सातबारा उताऱ्यावरील नोंदी, शेतजमिनीचे क्षेत्र, वारसनोंदी तसेच लाभार्थ्यांच्या यादीतील तपशिलांमध्ये तफावत असल्यास मदत वितरणाची प्रक्रिया रखडत आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना महसूल विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तांत्रिक अडचणींसोबतच महसुली नोंदींच्या दुरुस्तीअभावीही अनेक शेतकरी मदतीपासून दूर राहिले आहेत.