

रत्नागिरी : महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू झाल्यापासून गोरगरीब, गरजू रुग्णांना आधार अन् संजीवनी मिळत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंत वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात 22 हजार 575 केसेस दाखल झाल्या असून, त्यापैकी 10 हजार 836 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
दिवसेंदिवस या योजनेतून उपचार घेण्याचे प्रमाण वाढत चालले असून खासगी दवाखान्यात यासाठी लाखोंचा खर्च होत होता मात्र महात्मा फुले आरोग्य योजनेमुळे मोफत उपचार मिळत आहे. महागड्या उपचारासाठी गोरगरिबांकडे पैसे नसल्यामुळे त्यांचे हाल होत होते. किडनी प्रत्यारोपण, बायपास यासह विविध उपचारासाठी लाखोंचा खर्च येत होता. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत महागड्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनंतर्गत सर्वच नागरिकांना 5 लाखांपर्यंत उपचार मोफत केले. त्यामुळे रूग्णांकडून विविध उपचार करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात महागड्या शस्त्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूरसह मुंबई, पुणे येथे जावावे लागत होते. तसेच काहीजणांना महागडे उपचार करण्यासाठी सर्वसामान्यांना परवडत नसल्यामुळे कित्येकजण इलाज करण्यास पैशाची जुळवाजुळव किंवा काहीकारणास्तव आजार पुढे ढकलत होते, परंतु आता महागड्या शस्त्रक्रिया राज्य शासनाने योजनेत समाविष्ट केल्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब रूग्णांना आधार बनले आहे. आतापर्यंत 10 हजारहून अधिक रूग्णांनी या योजनेचा लाभ घेवून उपचार घेतले आहेत. या योजनेंतर्गत मोफत उपचारासाठी रूग्णांचे ऑनलाईन झालेले रेशन कार्ड, आधार कार्ड, डॉक्टरांचे प्रमाणपत्र तसेच रूग्णाचा कायम रहिवासी दाखला, फोटो इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करावी लागणार आहेत.