राजापूर : विविधांगी निसर्गसंपदेने नटलेल्या पश्चिम घाटातील निसर्गसंपदेच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनातर्फे पश्चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील 311 गावांमध्ये तालुक्यातील 51 गावांचा समावेश आहे. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत शासनाकडून लोकांच्या साठ दिवसांमध्ये हरकती मागविल्या आहेत. मात्र, त्याला सुमारे दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरी, अद्याप तालुक्यातून एकही तक्रार येथील उपविभागीय अधिकारी कार्यलयासह तहसील कार्यालयात दाखल झालेली नसल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.
निसर्ग संपदेने नटलेल्या पश्चिम घाटामध्ये दुर्मीळ वनसंपदेचा समावेश आहे. विविध कारणांमुळे ही वनसंपदा धोक्यात यण्याची शक्यता समाजाच्या विविध स्तरांमधून व्यक्त केली जात आहे. असे असताना पश्चिम घाटातील ही वनसंपदेचे जतन आणि संवर्धन होण्याच्या द़ृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातून, केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयातर्फे पश्चिम घाटातील काही क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पर्यावरणद़ृष्ट्या संवेदनशील गावे म्हणून समावेशाबाबतच्या अधिसूचनेवर साठ दिवसांमध्ये शासनाने हरकती मागविल्या आहेत. याबाबतची अधिसूचना 31 जुलै रोजी प्रसिद्धही करण्यात आली असून त्याची सोमवापर्यंत (दि 30 सप्टेंबर) रोजी संपली आहे.
ही अधिसूचना जाहीर होऊन सुमारे दीड महिन्याच्या कालावधी उलटला तरी, तालुक्यातील गावांमधून एकही हरकत दाखल झाली नसल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. अधिसूचनेवर हरकती दाखल करण्यासाठी अद्यापही आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये लोकांकडून हरकती दाखल होणार का? याची आता उत्सुकता लागून राहीली आहे.