

राजापूर : राजापूर तालुक्यातील गोठणे येथील एकाश्म सोमेश्वर मंदिर सध्या चर्चेचा विषय ठरत असून या मंदिराला “कोकणातील कैलास मंदिर” असे संबोधले गेल्यास वावगे ठरणार नाही . डोंगरकड्यात खडकात वरून खाली कोरलेल्या या मंदिरामुळे प्राचीन शिल्पकलेचा एक दुर्मीळ नमुना उजेडात आला आहे.
इतिहास संशोधक अनिल दुधाने व इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी केलेल्या पाहणीत हे मंदिर पूर्णतः एकाश्म स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले. मंदिराच्या गाभाऱ्यात खडकात कोरलेले पादपीठ व त्यावर स्थापित शिवलिंग, समोर नंदी आणि बाजूस स्थापित गणेश मूर्ती अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना येथे आढळते. विशेष म्हणजे, मंदिराचा पुढील सभामंडप नंतर बांधण्यात आल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत येथील ग्रामस्थांनी या एकाश्म मंदिराला प्लास्टर केला आहे त्यामुळे याचे महत्त्व सहज लक्षात येत नाही.मंदिराच्या मागील बाजूस पाहणी केल्यावर हे संपूर्ण मंदिर चारही बाजूंनी कातळ खोदून तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होते. याशिवाय परिसरात आणखी दोन एकाश्म रचना, कातळात कोरलेल्या पायऱ्या तसेच कातळात खोदलेली विहीरही आढळते. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, राजापूर परिसरातील अशा एकाश्म मंदिरांचा कालखंड साधारण इ.स. तिसरे ते सातव्या शतकादरम्यानचा असावा. वाकाटक काळात या कलेला चालना मिळाली असून पुढे ती अधिक विकसित होत जाऊन एलोरा येथील कैलास मंदिरासारखी भव्य निर्मिती घडली असावी . राजापूर तालुक्यात कोदवली, सोगमवाडी, पांगरे बुद्रुक, राजवाडी, वाडीखुर्द , सागवे , मिठागावाने आदी ठिकाणी सुमारे 26 एकाश्म मंदिरे व लेणी आढळली असल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व ठिकाणी आढळणारी पादपीठे व शिवलिंग पाहता ही स्थळे शैव उपासनेची केंद्रे असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याची मागणी स्थानिक नागरिक व अभ्यासकांकडून होत असून संबंधित विभागाने तातडीने पुरातत्त्वीय सर्वेक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .