

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर ऑगस्ट महिन्यापासून रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबलेल्याचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणार्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांनी केला. या टोळीतील एकाला अहिल्यानगर येथून अटक केली आहे. या संशयिताकडून 8 गुन्हे उघडकीस झाले आहेत. त्यातील 5 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून अन्य तिघांची नावे निष्पन्न झाली आहे. ते फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकात आयोजित पत्रकार परिषदेत लोहमार्ग पोलिस सहायक आयुक्त निलीमा कुलकर्णी यांनी माहिती दिली. यावेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर, तसचे रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाडवी यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विनोद सखाराम जाधव (रा. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
रत्नागिरी लोहमार्गावर विशेषतः रेल्वे क्रॉसिंगजवळ गाडी अंधारात थांबलेली असताना प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्याच्या तक्रारी ऑगस्ट महिन्यापासून वाढल्या होत्या. यातील काही गुन्ह्यांमध्ये ट्रेनमध्ये चढताना बांगड्या चोरीला गेल्याची नोंद आहे. लोहमार्ग पोलिसांनी यासाठी यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांची माहिती एकत्र करून त्यादृष्टीने तपास सुरू केला. तेव्हा यामध्ये काही सीसी टीव्ही फुटेज प्राप्त झाली त्याचा आधार घेऊन तांत्रिक तपासामध्ये अहिल्यानगर येथे चोरट्यांचा माग काढून एका संशयिताला अटक केली. विनोद जाधव असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला.
प्राथमिकद़ृष्ट्या टोळीमध्ये चौघे असल्याचे उघड झाले आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. चोरटे चोरी करण्यापूर्वी रेल्वे स्टेशन आणि परिसरात जाऊन रेखी करायचे. अनेक रेल्वे क्रॉसिंग स्टेशन निर्जन व जंगलमय भागात आहेत. त्याचा फायदा हे चोरटे घेतात. तसेच लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी ते मोबाईल वापरत नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेताना पोलिसांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
एकमेकाच्या खांद्यावर चढुन रेल्वेतील बेसावध प्रवाशांचे मोबाईल, पर्स किंवा गळ्यातील दागिने चोरण्याचा या टोळीचा फंडा आहे, अशी माहिती निलीमा कुलकर्णी यांनी दिली. टीम पंधरा दिवस त्यांच्या मागवर होती. तेव्हा त्यातील एक सापडला. याची कुणकुण इतर साथिदारांना लागल्याने ते फरार झाले आहेत. त्यांचा शोध लोहमार्ग पोलिसांकडून घेतला जात आहे.
विविध रेल्वे स्थानकांवर 300 सीसीटीव्हीची गरज
रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे सध्या 27 पोलीस स्थानके येतात. पोलिसांच्या मदतीला जवळपास 180 होमगार्ड घेण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचारी असा स्टाफ रत्नागिरीत आहे. सध्या एक अमंलदार आणि चार होमगार्ड प्रत्येक स्थानकाची सुरक्षा सांभाळत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आणखी साडेतिनशे सीसीटीव्ही रेल्वे स्थानकांवर बसवण्यात यावेत अशी मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त निलीमा कुलकर्णी यांनी सांगितले.