

रत्नागिरी: पोस्टाच्या भरतीत बोगस प्रमाणपत्रे बनवून ती खरी असल्याचे भासवत शासनाची दिशाभूल करणार्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 जुलै 2023 ते 21 नोव्हेंबर 2023 या कालावधीत रत्नागिरी मुख्य डाकघर कार्यालयात घडली आहे.
अनंत मारुती शेळके (22, रा. कोकणगा लातूर) आणि लंकेश नामदेव राठोड (25, रा. शिरढोन ता. कंधार, जि. नांदेड) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात रत्नागिरीचे सहाय्यक डाकघर अधीक्षक (मुख्यालय) रत्नागिरी विभाग ज्ञानेश श्रीपाद कुलकर्णी (38, रा. खारेघाट रोड, रत्नागिरी) यांनी 24 नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार, संशयितांनी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था, नोईडा यांची बोगस प्रमाणपत्रे बनवून ती खरी म्हणून तीचा पोस्टाच्या भरती प्रक्रियेत भरती होण्यासाठी वापर केला. याद्वारे त्यांनी शासनाची दिशाभूल करुन फसवणूक केली आहे. संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 465, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.