

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे स्मशानभूमीतच हाणामारीचा प्रकार झाला आहे. नातेवाईक येत असल्यामुळे अग्नी देऊ नका, असे सांगणार्या व्यक्तीला चौघांनी डोक्यात दगड मारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकाराची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे. स्मशानभूमीतच हा राडा झाल्याने अंत्यविधीसाठी आलेले नातेवाईक चक्रावून गेले.
ही घटना दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. पिंपळी स्मशानभूमी येथे घडली. याबाबतची फिर्याद प्रशांत पोपट चव्हाण (वय 33, सध्या रा. आकले, मूळ रा. कळकवणे) यांनी दिली असून चिपळूण पोलिसांनी किरण बाळू जाधव (पाटण), मुगुट व्यंकट जाधव, अविनाश मुगुट जाधव, सौरभ सुनील जाधव (सर्व रा. तळदेव, ता. महाबळेश्वर) अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत चव्हाण यांची मामी कविता बाळू जाधव यांच्या अंत्यविधीसाठी पिंपळी खुर्द येथी स्मशानभूमीत गेले होते. त्या ठिकाणी अन्य नातेवाईक देखील जमले होते. यावेळी प्रशांत चव्हाण यांनी, आपले आई-वडील व अन्य लोक येत आहेत. ते रस्त्यातच आहेत. थोडा वेळ थांबा. त्यांनादेखील अंत्यदर्शन होऊ द्या, असे जमलेल्या नातेवाईकांना विनंती करून सांगितले. परंतु तेथे उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी, आता थांबायचे नाही, अग्नी द्या असे बोलू लागले. त्याला अन्य लोकांनीही दुजोरा दिला. त्यामुळे चव्हाण यांचे कुणीही ऐकले नाही. यावेळी तेथे असलेल्या चार आरोपींनी शिवीगाळ करून जवळच असलेला दगड फिर्यादी यांच्या डोक्यात मारला. या शिवाय हाताच्या ठोश्यांनी पाठीत मारहाण करून मृतदेह सरणावर असतानाच ही हाणामारी झाली.
या प्रकारानंतर दमदाटी करून, तुला सोडणार नाही, अशी धमकीदेखील दिली. यामध्ये प्रशांत चव्हाण हे जखमी झाले. मृतात्म्याला श्रद्धांजली वाहण्याऐवजी या ठिकाणी नातेवाईकांमध्येच राडा झाल्याने तेथे उपस्थित असलेले सगेसोयरे अचंबित झाले.