

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हफ्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार १४३ शेतकरी या लाभासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ३१ कोटी १८ लाख ८६ हजार रुपये जमा झाले असून, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हफ्त्यात दोन हजार रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
तालुकानिहाय लाभार्थ्यांचा विचार करता चिपळूण तालुक्यात सर्वाधिक २१ हजार ५४० शेतकरी पात्र आहेत. त्यांच्या खात्यावर ४ कोटी ३० लाख ८० हजार रुपये जमा होणार आहेत.
गुहागर तालुक्यात २० हजार १८९ लाभार्थ्यांना ४ कोटी ३ लाख ७८ हजार रुपये, तर संगमेश्वर तालुक्यातील १९ हजार १२० शेतकऱ्यांना ३ कोटी ९८ लाख ४० रुपयांचा लाभ मिळणार आहे.
खेड तालुक्यात १९ हजार ३५५ शेतकऱ्यांना ३ कोटी ८० लाख १० हजार रुपये, रत्नागिरी तालुक्यात १७ हजार ९९० शेतकऱ्यांना ३ कोटी ९५ लाख ८० हजार रुपये, दापोलीत १७ हजार ८९९ शेतकऱ्यांना ३ कोटी ५७ लाख ९८ रुपये आणि लांजा तालुक्यातील १७ हजार ६५० शेतकऱ्यांना ३ कोटी ५३ लाख रुपये मिळणार आहेत.
राजापूर तालुक्यातील १४ हजार ६६० शेतकऱ्यांना २ कोटी १३ लाख २० हजार रुपये, तर मंडणगड तालुक्यातील ६ हजार ७४० शेतकऱ्यांना १ कोटी ३४ लाख ८० रुपयांचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ५५ हजार १४३ लाभार्थ्यांना ३१ कोटी १८ लाख ८६ हजार रुपयांचे वितरण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात आर्थिक मदत मिळाली आहे.
किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. २१ हजार ५४० शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ कोटी ३० लाख ८० हजार रूपये जमा झाले आहेत, तर सर्वात कमी मंडणगड तालुक्यातील ६ हजार ७४० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ३४ लाख ८० हजार रुपये जमा झाले आहेत.